Join us

स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत एकरकमी पहिल्या उचालीचा आकडा ठरला सोबत 'या' १८ ठरावांना मंजुरी; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:34 IST

Swabhimani Us Parishad 2025 Tharav गतवर्षी तुटलेल्या उसाला एफआरपीपेक्षा जादाचे २०० रुपये अंतिम बिल देण्यात यावे. या दोन्ही मागण्याबाबत दि. १० नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदारांनी निर्णय घ्यावा.

संदीप बावचेजयसिंगपूर : चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,७५१ रुपये पहिली उचल दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही.

गतवर्षी तुटलेल्या उसाला एफआरपीपेक्षा जादाचे २०० रुपये अंतिम बिल देण्यात यावे. या दोन्ही मागण्याबाबत दि. १० नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदारांनी निर्णय घ्यावा.

अन्यथा गाठ आमच्याशी आहे असे लढ्याचे रणशिंग स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे फुंकले.

संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी दि. २८ ऑक्टोबरला अमरावती ते नागपूर लाँगमार्च काढण्यात येणार आहे, तरी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही शेट्टी यांनी यावेळी केले.

येथील विक्रमसिंह मैदानावर स्वाभिमानीच्या वतीने २४ वी ऊस परिषद झाली. परिषदेला प्रतिवर्षाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटकातूनही हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. नांदणीतील संघटनेचे कार्यकर्ते हसन मुस्सन अध्यक्षस्थानी होते.

शेट्टी म्हणाले, एफआरपीचे तुकडे करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला आहे. याविरोधात साखर कारखानदार आणि राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.

मात्र साखर सम्राटांना घेऊन राज्य सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत असेल तर या सरकारला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. पाच हजार टन ऊस गाळप करणारा कारखाना ५०० टन काटामारीतून रोज १५ लाख रुपये काळा पैसा बाहेर काढतो.

तोडणी वाहतूक खर्चाबाबत शेतकऱ्यांची लुबाडणूक कारखानदार करत आहेत. याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहे. ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर काटामारी व रिकव्हरी चोरीवर करावा, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली. यापुढील काळात न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.

शेतकऱ्यांना ४६० रुपये मिळणारा उसाचा दर स्वाभिमानीमुळेच ३२०० रुपयापर्यंत पोहचला आहे असे सांगून जिल्हाध्यक्ष अजित पोवार म्हणाले, काटामारी करणाऱ्या कारखानदारांना तुरुंगात टाकल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेऊन मिरवू

यावेळी डॉ. दीपिका कोकरे, पुरंदर पाटील, विजय रणदिवे, पोपट मोरे, अजित पोवार, अमर कदम, सूर्यभान जाधव, किशोर ढगे, प्रकाश पोफळे यांची भाषणे झाली. तानाजी वाठारे यांनी स्वागत केले. विठ्ठल मोरे यांनी प्रास्ताविक केले.

परिषदेला सुभाष शेट्टी, डॉ. सुभाष अडदंडे, राजेंद्र गड्डयाण्णावर, विक्रम पाटील, डॉ. महावीर अक्कोळे, सचिन शिंदे, राम शिंदे, सुवर्णा अपराज, शैलेश चौगुले, शंकर नाळे, राजगोंडा पाटील, जयकुमार कोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उच्चांकी गर्दी, महिलांचा सहभागपरिषद साडेचार वाजता सुरू झाली; परंतु सुरुवातीला शेतकऱ्यांची उपस्थिती कमी होती. शेट्टी यांचे परिषद स्थळी आगमन होताच जोरात जल्लोष झाला व बघता बघता विक्रमसिंह मैदान शेतकऱ्यांनी फुलून गेले. महिलांचीही संख्या लक्षणीय होते. नेत्यांच्या भाषणाला शेतकरी शिट्टया. टाळ्या वाजवून जोरात प्रतिसाद देत होते.

शेट्टींची भावनिक सादसंघर्षामुळेच शेतकऱ्यांच्या उसाला आतापर्यंत भाव मिळाला आहे. न्यायालयीन व रस्त्यावरच्या लढाईतूनच दर मिळणार आहे. उसाचा दर हा कारखान्यात, बारामतीत ठरत नाही तर तो ठरतो जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये, त्यामुळे मी असो वा नसो, मात्र ही चळवळ कायमपणे सुरू राहिली पाहिजे, अशी भावनिक साद शेट्टी यांनी घातली.

काटामारीतून नवा कारखानाकाटामारीतून वर्षाला एक नवीन कारखाना तयार होऊ शकतो. पेट्रोल पंपावर काटा मारला तर लगेच सॉफ्टवेअरद्वारे कळते. तशी यंत्रणा तयार केली तर काटामारी का रोखली जाऊ शकत नाही, असा प्रश्न शेट्टींनी उपस्थित केला.

१८ ठरावांना मंजुरीऊस परिषदेमध्ये अठरा ठराव मंजूर करण्यात आले. एआय तंत्रज्ञानाचा काटामारी व उत्तारा चोरी रोखण्यासाठी उपयोग करा, साखरेची आधारभूत किंमत ३,१०० रुपयांवरून ४,५०० रुपये करावी, शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, सोयाबीन, भात, मका, नाचणी यांची हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू करावीत.

ऊस पाठवायला गडबड करू नका३० जानेवारीच्या आत उसाचा हंगाम संपणार आहे. दराबाबत निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस पाठविण्यासाठी घाईगडबड करू नये. जास्त काळ हंगाम चालणार नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले

'लोकमत'चे अभिनंदन'उसाचा काटा, शेतकऱ्यांचा घाटा' या मथळ्याखाली 'लोकमत'ने वृत्तमालिका प्रसिद्ध करून होणाऱ्या काटामारीवर जोरदार प्रहार केला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनीही साखर कारखाने काटामारी करत असल्याचे मान्य केले. या वृत्त मालिकेचा उल्लेख ऊस परिषदेत करत शेतकऱ्यांच्च्या प्रश्नांना 'लोकमत'नेच खऱ्या अर्थाने वाचा फोडल्याबद्दल तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने लोकमतवे अभिनंदन करण्यात आले.

अधिक वाचा: आता खरेदीखतापूर्वीच जमिनीची हद्द कायम होणार; काय आहे निर्णय? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Swabhimani Shetkari Sanghatana Sets ₹3,751 as Initial Sugarcane Price

Web Summary : Swabhimani Shetkari Sanghatana's sugarcane conference declared ₹3,751 as the first installment price for sugarcane. Raju Shetti warned sugar factories to comply by November 10th, or face action. The conference also addressed farmer loan waivers and sugarcane cutting malpractices, urging farmers to prepare for legal battles.
टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतकरीशेतीपीकस्वाभिमानी शेतकरी संघटनाराजू शेट्टीकोल्हापूरउच्च न्यायालयन्यायालयराज्य सरकारसरकार