वर्धा : यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो की आताचा रब्बी हंगामाच्या तोंडावरील अवकाळी पाऊस; शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यात आता ऐन रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत असताना रब्बी हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने नवीन संकट उभे राहिले आहे.
शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक धक्का बसवणारी ही दरवाढ मोठी संकटाची ठरणारी आहे. पेरणीचा हंगाम सुरू होताच विविध रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.
आधीच कापूस आणि सोयाबीन पिकांच्या दरात घट झाल्याने ताणलेले अर्थकारण आता खतांच्या महागाईमुळे आणखी बिघडले आहे. विविध रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.
गेल्या दोन हंगामांपासून पिकांना अपेक्षित दर मिळत नाहीत. आता खतं महागल्याने रब्बीची शेती परवडणं कठीण झालंय. सरकारने दर नियंत्रणात आणावेत. - राहुल चौधरी, शेतकरी, गोविंदपूर जि. वर्धा.
२५० ते ३५० रुपयांपर्यंत झाली आहेत भाववाढ
या दरवाढीमुळे हेक्टरमागे लागणाऱ्या खतांच्या खर्चात तब्बल २५० ते ३५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच युरिया आणि डीएपी खतांची अधिक दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत.
काही ठिकाणी विक्रेत्यांकडून या खतांसोबत इतर खत जबरदस्तीने दिले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. कृषी विभागाने वा वाढीव दरांच्या विक्रीवर लक्ष ठेवणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
रासायनिक खतांच्या दरवाढीने केंद्र सरकारच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणांचा पुन्हा पुरावा दिला आहे. सरकारने खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना संतुलित खत वापराचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शेतीमालाचे भाव वाढवण्याऐवजी खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. - वैभव देशमुख, शेतकरी, पहेलानपूर जि. वर्धा
रासायनिक खतांचे प्रकार आणि वाढलेले दर
| खते | जुने दर | नवे दर |
| १०:२६:२६ | १७२५ | १९२५ |
| १५:१५:१५ | १४५० | १६५० |
| २०:२०:०:१३ | १३०० | १५०० |
| १६:१६:१६ | १४७५ | १६०० |
| २४:२४:०० | १८५० | १९०० |
| ०८:२१:२१ | १८०० | २१५० |
| ९:२४:२४ | १८५० | २१०० |
| म्युरेट, पोटॅश | १५२५ | १८०० |
| १४:३५:१४ | १७०० | १८०० |
| १२:३२:१६ | १७५० | १८५० |
शेतकऱ्यांवर संकट
आधीच नापिकीने संकट ओढवले आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशातच खतांची दरवाढ झाली असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारने लक्ष देत खतांचे दर कमी करण्याची मागणी आहे.
