सोलापूर : अतिवृष्टीबाधित साडेचार हजार कुटुंबीयांच्या खात्यात मंगळवार, दि. ३० सप्टेंबरपासून दहा हजार रुपये मदत निधी जमा करण्यात येणार आहे.
तसेच पूरग्रस्त २० हजार कुटुंबीयांना महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचा किट देण्याचे नियोजन असून ही मदत दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आणि दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी सोमवारी सकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रत्येक बाधितांपर्यंत मदत पोहोचवावी, असे निर्देश दिले.
बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
गोरे म्हणाले की, घरांचे नुकसान झालेल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात येतील. गावांची स्वच्छता नीटनेटकी करण्यासाठी गरज पडल्यास एजन्सी नियुक्त करावी. रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित करावी.
निवारा केंद्रातील १३ हजार नागरिकांना दोनवेळचे जेवण मिळाले पाहिजे, तर जनावरांसाठी पुरेशा प्रमाणात चाऱ्याची सोय व्हावी. जिल्ह्यातील २५ ते २६ हजार जनावरांसाठी ३०० मेट्रिक टन मुरघास चारा बफर स्टॉक म्हणून ठेवला आहे.
दररोज १०० ते १२० टन चाऱ्याची आवश्यकता असून, पुढील आठ दिवस पुरेसा साठा आहे. जिल्हा पुरवठा विभागाने पूरग्रस्तांना दहा किलो गहू, दहा किलो ज्वारी व तीन किलो तूरडाळ मोफत वाटप सुरू केले आहे.
वीज वितरण कंपनीला २४ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून ९५ गावांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र, २७गावे अद्याप पाण्यात असल्याने तेथील वीजपुरवठा पाणी ओसरल्यानंतरच सुरू होईल
नदीकाठच्या गावांना १०० टक्के मदत◼️ जिल्ह्यातील ११० पैकी ७२ मंडळात एक वेळा, ७० मंडळांत दोन वेळा, तर २० मंडळांत तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे.◼️ अतिवृष्टी व भीमा-सीना नदीच्या पुरामुळे सहा तालुक्यांतील ९२ गावे बाधित झाली आहेत. ८१ गावांत वीज खंडित झाली असून, १४०० डीपी वाहून गेल्या आहेत.◼️ नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला असून, त्यांना शंभर टक्के मदत मिळेल, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.
अधिक वाचा: उजनी व वीर धरणांतून एकूण १ लाख ३४ हजार क्युसेकचा विसर्ग; चंद्रभागेला पुराचा धोका वाढला