बुधवार (दि.२६) रोजी पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि 'आत्मा' (ATMA - कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव तालुक्यात तालुकास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा नुकतेच उत्साहात पार पडले.
या कार्यशाळेमध्ये उपस्थित असलेल्या तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकरी गटांना पानी फाउंडेशनचे नानासाहेब सुर्यवंशी, गणेश खामकर, मन्मथ धुप्पे यांनी 'सत्यमेव जयते फार्मर कप' (Farmer Cup) स्पर्धेच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले तांत्रिक मार्गदर्शन, पाणी फाउंडेशनचा प्रेरणादायी प्रवास आणि निवासी प्रशिक्षणामध्ये समाविष्ट असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती दिली.
तसेच मार्गदर्शकांनी पाणी फाउंडेशनच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची माहिती दिली. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी पाणी फाउंडेशनने केलेल्या कार्यामुळे प्रेरित होऊन शेतकऱ्यांनी जलसंधारण आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचे महत्त्व जाणून घेतले.
फार्मर कप स्पर्धा मे २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार असून, तिचा मुख्य हेतू गट शेतीला प्रोत्साहन देणे, उत्पादन खर्च कमी करणे आहे. दरम्यान फार्मर कप २०२६ करिता तालुक्यातील १०० शेतकऱ्यांची ३ दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात आली.
यावेळी निवासी शेतकरी प्रशिक्षणामध्ये कोणत्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच यामध्ये प्रामुख्याने जलसंधारणाचे विविध प्रकार, माती परीक्षण, पीक नियोजन, आधुनिक सिंचन पद्धती, सेंद्रिय शेतीचे तंत्र आणि शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती यासारख्या विषयांचा समावेश असेल असे सांगण्यात आले.
दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक नांदगाव तालुका कृषी अधिकारी रविंद्र डमाळे यांनी केले. ज्यात त्यांनी या संयुक्त उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषि अधिकारी नायडोंगरी अमोल थोरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विरेंद्र तवले सहाय्यक कृषी अधिकारी, वडाळी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हेही वाचा : बाजारात आलेली हरभऱ्याची हिरवी भाजी खा, रोगप्रतिकारशक्ती वाढवा; आहारतज्ज्ञांचा सल्ला
