भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे यूनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतील ग्राहकांनाही वीज बिल आकारण्यात येणार आहे.
यातील ग्राहकांना संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत वापरलेल्या विजेवर बिल आकारावे, असा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे दिला आहे.
वीज बिल आकारणी झाली, तर मोफत वीजेचीही जुमलेबाजी ठरणार आहे. संबंधित ग्राहकांना बिलाचा शॉक बसणार आहे. कर्ज काढून घरावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवलेल्यांना बँकेचा हप्ता आणि वीजबिल, असा दुहेरी झटका बसणार आहे.
राज्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा महावितरणननेही व्यापक प्रचार, प्रसिद्धी करत आहे. यामुळे राज्यातील एक लाखांवर वीज ग्राहकांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून वीज निर्माण करत आहेत.
घरगुती वापरापेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीजबिल शून्य येत आहे. अतिरिक्त वीज महावितरणला पाठवून उत्पन्नही मिळत आहे. पॅनेल्स बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून तीन किलोवॅटला ७८ हजार रुपयांपर्यंत थेट अनुदान मिळत आहे.
दरम्यान, वीज बिलातून सुटका करून घेण्यासाठी याकडे ग्राहक मोठ्या प्रमाणात वळत असतानाच महावितरणने या योजनेतील ग्राहकांना केवळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत मोफत वीज द्यावी आणि त्यानंतरच्या विजेवर बिल आकरावे, असा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे.
यावर १७ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या. पण, यापूर्वीच्या आयोगाचा अनुभवावरून हरकती कितीही आल्या, तरी महावितरणच्या बाजूनेच झुकते माप असल्याने सूर्यघर योजनेतील ग्राहकांनाही वीज बिल भरण्याची शक्यता अधिक आहे.
गरज नसताना मोफत आणि...
दिवसभर विजेचा वापर नगण्य असतो. यावेळी सूर्यघरमधील ग्राहकांना मोफत आणि रात्रीच्यावेळी गरज असते. त्यावेळी बिलाची आकारणी करण्याचा डाव आहे. असे असेल, तर मग अडीच ते तीन लाख रुपये खर्च करून सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्स बसवून ग्राहकांना फायदा काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जानेवारी अखेर राज्यातील लाभार्थी : १,००,७००
छतावर सौर प्रकल्प बसवलेल्या ग्राहकांची जिल्हानिहाय संख्या
नागपूर - १६,९४९
पुणे - ७,९३१
जळगाव - ७,५१४
छत्रपती संभाजीनगर - ७,००८
नाशिक - ६,६२६
अमरावती - ५,७९५
कोल्हापूर - ५,०२४
महावितरणने सूर्यघर योजनेतील ग्राहकांना बिलाची आकारणी केली, तर मूळ उद्देशाला धक्का लागणार आहे. बिल भरायचे असेल, तर कर्ज काढून सौर उर्जा पॅनेल्स का बसवायचे, असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. ग्राहकांनी या योजनेकडे पाठ फिरवली, तर सौर उर्जेसंबंधीच्या उद्योगांना जबर फटका बसणार आहे. - नितीन कुलकर्णी, संचालक, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चर असोसिएशन, कोल्हापूर
अधिक वाचा: Jamin Mojani : एक हेक्टर जमिनीची मोजणी आता होणार फक्त एका तासात; आलंय हे नवं तंत्रज्ञान