सोलापूर : साखर हंगाम सुरू होऊन सव्वा महिना उलटला तरी जिल्ह्यातील १७ साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला नाही.
एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले शिवाय शेतकरी संघटना आक्रमक होत असताना दुसरीकडे साखर कारखाने दर जाहीर करीत नसल्याचे चित्र आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. कोणी ऑक्टोबर अगोदर तर कोणी ऑक्टोबर महिन्यात ऊस गाळप सुरू केले आहे.
असे असले तरी साखर कारखानदार ऊस दर जाहीर करीत नाहीत व जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत नसल्याचे चित्र आहे.
केवळ माढा, माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील सात-आठ साखर कारखानदारांनी ऊस दर जाहीर केला आहे. जाहीर केलेल्या सर्वच साखर कारखान्यांचा दर प्रति टन २,८०० ते ३,००० रुपयांपर्यंत आहे.
गाळप हंगाम सुरू केलेल्या ३३ पैकी १६ साखर कारखान्यांचा ऊस दर जाहीर झाला मात्र १६ साखर कारखानदार ऊस दर जाहीर करीत नसले तरी कारखान्याचे गाळप मात्र सुरू आहे.
आठ कारखान्यांचा दर जाहीर
◼️आलेगाव येथील शिवगिरी अॅग्रो कारखान्याने प्रति टनाला ३,००१ रुपये दर जाहीर केला असून २,८०० रुपये पहिला हप्ता, १०० रुपये दुसरा तर १०१ रुपये तिसरा हप्ता देण्याचे जाहीर केले आहे.
◼️ शंकर सहकारी २,९०० रुपये.
◼️ श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना गुरसाळे पंढरपूरने २,८७५ रुपये.
◼️ श्री. पांडुरंग श्रीपूरने २,८५५ रुपये.
◼️ सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील अकलूज २,८५० रुपये.
◼️ विठ्ठल रिफायनरी, बबनराव शिंदे, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब २,८५० रुपये.
◼️ दि. सासवड माळी शुगर माळीनगर, श्री. संत कुर्मदास माढा, येडेश्वरी शुगर खामगाव, सीताराम महाराज खर्डी, आष्टी शुगर, जकराया शुगर व भैरवनाथ शुगर लवंगी या दोन्ही कारखान्यांनी २८०० दर जाहीर केला आहे.
कोणते सुरु कोणते बंद?
◼️ आदिनाथ करमाळा, सहकार शिरोमणी वसंतराव काळे पंढरपूर, लोकशक्ती शुगर तेरामैल, इंद्रेश्वर शुगर उपळाई ठोंगे व मकाई करमाळा हे पाच साखर कारखाने अद्याप सुरू झाले नाहीत.
◼️ यापैकी लोकशक्ती इंद्रेश्वर व सहकार शिरोमणी हे साखर कारखाने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
◼️ गोकूळ धोत्री, जयहिंद आचेगाव, सिद्धेश्वर सोलापूर व लोकमंगल बीबीदारफळ हे साखर कारखाने सुरू असले तरी त्यांनी गाळपाची माहिती भरली नसल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अधिक वाचा: राज्यात १७४ साखर कारखाने सुरू; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गाळप? यंदा साखर उताऱ्यात कोण पुढे?
