Join us

Sugarcane FRP 2024-25 : उसाची थकीत एफआरपी १५ टक्के व्याजासह द्यावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 16:59 IST

Sugarcane FRP 2024-25 गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे एफआरपी प्रमाणे सगळे पैसे साखर कारखान्यांनी अद्याप दिलेले नाहीत.

कोल्हापूर : गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे एफआरपी प्रमाणे सगळे पैसे साखर कारखान्यांनी अद्याप दिलेले नाहीत.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांकडे १३१ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठवला आहे.

राज्य शासनाने एफआरपीचे तुकडे करण्याचा कायदा केल्यानंतर त्याविरोधात शेतकरी संघटनांनी न्यायालयात दाद मागितली होती.

त्यावर, न्यायालयाने केंद्र सरकारच्या कायद्यात मोडतोड करण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचे सांगत, शेतकऱ्यांना एकरकमीच उसाचे पैसे द्यावेत, असे आदेश दिले.

त्यानंतरही बहुतांशी कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही. थकीत एफआरपीसाठी शेतकरी संघटनांनी साखर आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

अशी निश्चित केली जाते एफआरपीमागील हंगामाचा सरासरी साखर उतारा आणि मागील हंगामाचा ऊस तोडणी- वाहतूक खर्च विचारात घेऊन चालूची एफ. आर. पी. ठरवली जाते. या सूत्राचा आधार घेतल्यानंतर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांकडे मोठी थकबाकी दिसत आहे.

मग कारखान्यांना अडचण कोठे आहे...संपलेल्या २०२४-२५ या गळीत हंगामात साखरेचे दर प्रतिक्विंटल ३३०० रुपयांपर्यंत राहिले. बग्यास २४०० रुपये टन तर मळी १२ हजार रुपये टन होती. हंगाम संपताना यामध्ये मोठी दरवाढ झाली. साखर प्रतिक्विंटल ४ हजार, बग्यास ४ हजार रुपये टन तर मळी १५ हजार रुपये टनापर्यंत पोहोचली आहे. वाढलेल्या साखर व उपपदार्थांच्या दरातून कारखान्यांना एफआरपीच्या वर ५०० रुपये सहज देता येतात, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

आंदोलन अंकुश संघटनेने केलेल्या तक्रारीवर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांना थकीत एफआरपीचा अहवाल गेल्याच आठवड्यात पाठवला आहे. थकीत १३१ कोटी एफआरपी १५ टक्के व्याजासह देण्याचे आदेश साखर आयुक्तांना द्यावे लागणार आहेत. - धनाजी चुडमुंगे (नेते, आंदोलन अंकुश संघटना)

अधिक वाचा: येत्या खरीप हंगामापासून सर्व प्रकारच्या बियाण्याची विक्री साथी पोर्टलवरून; वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीराज्य सरकारसरकारआयुक्तकोल्हापूरकेंद्र सरकारन्यायालयसांगली