अण्णा नवथर
अहिल्यानगर : विधानसभेची निवडणूक झाली. आचारसंहिताही संपली. तरीही एकाही साखर कारखान्याने उसाचा भाव जाहीर केला नाही. गतवर्षी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील कारखान्यांनी सुरुवातीलाच भाव जाहीर केले होते.
यावेळी मात्र कारखाने सुरू होऊनही भाव जाहीर होत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांचे कारभारी विधानसभेच्या मैदानात होते. त्यामुळे त्यांच्या अधिपत्याखालील कारखान्यांची यंत्रणाही निवडणुकीत व्यस्त होती.
निवडणूक संपताच मतदानानंतर जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा शुभारंभ झाला. ऊसतोडणी कामगारही दाखल झाले असून, तोडणीही सुरू झाली आहे. असे असले तरी एकाही साखर कारखान्याने उसाचे भाव जाहीर केले नाहीत.
शासनाने प्रतिक्विंटल ३ हजार ४०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे. एफआरपीच्या रकमेतून वाहतूक खर्च वजा केला जातो. परंतु, हा खर्चही अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. शेतकरी संघटना व कारखान्यांच्या प्रतिनिधींचीही बैठक झालेली नाही.
गेल्यावर्षी जिल्ह्यातील कारखान्यांनी २७०० ते ३२०० रुपयांपर्यंतचा भाव दिला. सर्वाधिक दर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने दिला होता. यंदा विखे कारखान्यानेही भाव जाहीर केले नाहीत.
विशेष म्हणजे शेतकरी संघटनांनी कारखान्यांकडे दर जाहीर करण्याचा आग्रह धरलेला नाही. त्यामुळे कारखाने सुरू झाले, पण दर कधी ठरणार, याची चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागून आहे.
नगर जिल्ह्यात हे कारखाने झाले सुरू
• अगस्ती सहकारी साखर कारखाना
• अशोक सहकारी साखर कारखाना
• लोकनेते मारुतराव घुले पाटील
• प्रसाद शुगर
• पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील
• गणेश सहकारी साखर कारखाना
• सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे
• कर्मवीर शंकरराव काळे
• सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात
• क्रांती शुगर
• गौरी शुगर
• अंबालिका
• गंगामाई
• बारामती अॅग्रो
या कारखान्यांची प्रक्रिया सुरु
केदारेश्वर, वृद्धेश्वर, मुळा, कुकडी, गजाजन, ओंकार, स्वामी समर्थ.
यंदा ३४०० रुपये एफआरपी
• केंद्र शासनाने उसासाठी प्रति क्विंटल ३४०० रुपये इतका रास्त किफायतशीर (एफआरपी) दर निश्चित केला आहे.
• साखर आयुक्त अनिल कवडे यांचे तसे परिपत्रक येथील प्रादेशिक सहसंचालक कार्यालयास प्राप्त झाले आहे.
• गतवर्षी ३१५० रुपये एफआरपी होती. वाहतूक खर्च वजा करून कारखान्यांनी २८०० रुपयांपर्यंत भाव दिला होता. एकमेव विखे यांच्या कारखान्याने ३२०० रुपयांचा भाव दिला होता.