Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane : पाणी मिळूनही ऊस घेण्यास शेतकरी धजावेना ; काय आहे कारण वाचा सविस्तर 

Sugarcane : पाणी मिळूनही ऊस घेण्यास शेतकरी धजावेना ; काय आहे कारण वाचा सविस्तर 

Sugarcane : Farmers may not be interested in sugarcane for a variety of reasons | Sugarcane : पाणी मिळूनही ऊस घेण्यास शेतकरी धजावेना ; काय आहे कारण वाचा सविस्तर 

Sugarcane : पाणी मिळूनही ऊस घेण्यास शेतकरी धजावेना ; काय आहे कारण वाचा सविस्तर 

शेतीला बारमाही पाणीपुरवठा करुनही शेतकरी आता ऊस पिकाकडे वळताना दिसत नाही. जाणून घेऊयात काय आहे कारण. (Sugarcane Factory)

शेतीला बारमाही पाणीपुरवठा करुनही शेतकरी आता ऊस पिकाकडे वळताना दिसत नाही. जाणून घेऊयात काय आहे कारण. (Sugarcane Factory)

शेअर :

Join us
Join usNext

भूषण काळे

नांदेड : जिल्ह्याला बळकटी यावी म्हणून शेतीला बारमाही पाणीपुरवठा करण्यासाठी लाखो एकर जमिनी हस्तांतरित करून कॅनॉलची कामे करण्यात आली. यामुळे इसापूर, विष्णुपुरी, लिंबोटी व बारूळ धरणातून मिळणारे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्याची सोय झाली. 

मात्र, शेतमालावर प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात नसल्यामुळे शेतकरी बागायती पिके घेण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच नायगाव तालुक्यातील शंकरनगर व लोहा तालुक्यातील कलंबर येथील ऊस कारखाना अवसायनात निघाल्यामुळे याचा फटका दोन्ही तालुक्यांतील 
शेतकऱ्यांना बसला आहे.

परिणामी, येथील शेतकरी पाणी उपलब्ध असतानाही ऊस पीक घेण्याचे धाडस करीत नसून, पारंपरिक पिकांनाच प्राधान्य देत असल्याने या परिसरात कॅनॉलद्वारे येणारे पाणी वाया जात आहे.

पूर्वी नायगाव, कंधार, लोहा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करीत असत. त्यांचा ऊस तालुक्यातील कारखान्यांना जात असल्याने सोयीचे होते. मात्र, मागील काही वर्षांपासून शंकरनगर व कलंबर येथील ऊस कारखाने बंद झाले. 

त्यामुळे कुंटूर, वाघलवाडा तसेच वाडी येथील कारखान्यांना उसाची आवक वाढली. परिणामी, अनेक शेतकऱ्यांचा ऊस जाण्यास वेळ लागला. तर काही शेतकऱ्यांना अक्षरशः उसाचे पीक शेतातच जाळून टाकावे लागले. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. 

आता या परिसरातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्याचा विचारच मनातून काढून टाकला आहे. ते कॅनॉलचे पाणी मिळत असताना सुद्धा सोयाबीन, ज्वारी, तूर, कापूस, हरभरा अशी कोरडवाहू पिके घेऊ लागले आहेत.

क्वचित चार- दोन शेतकरी गहू, भाजीपाला पिके घेतात. त्यामुळे कधीकाळी नजर जाईल तिथपर्यंत दिसणारे उसाचे पीक या परिसरातून गायब झाले असून, केवळ पारंपरिक पिकांवरच शेतकरी अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

नायगाव, लोहा, कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांना बागायती शेती करून आपले गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासनाने या परिसरातील ऊस कारखाने पूर्ववत चालू करण्याची नितांत गरज आहे. 

तसेच शेतकऱ्यांना शेतीला जोडव्यवसाय म्हणून लघु उद्योग करण्याचे प्रशिक्षण देऊन, आवश्यक ती सामग्री व अर्थसाहाय्य करण्यासाठी शासनाने त्वरित पुढाकार घेणे गरजेचे आहे.

थकबाकीमुळे कारखाना बंद

● खतगावकर कुटुंबीय संचालक मंडळ असलेला नायगाव तालुक्यातील शंकरनगर येथील कारखाना थकबाकीमुळे बंद पडला. सुरुवातीला या कारखान्यावर २५ कोटींचे कर्ज होते ते वाढून १२५ कोटी झाले. १९८२ मध्ये हा कारखाना सुरू झाला.

● २००१ मध्ये बंद पडला. त्यानंतर मुंबईच्या एका कंपनीने हा कारखाना २ वर्षे चालविला, त्यानंतर २००४ पासून हा कारखाना पूर्णतः बंद आहे. येथील कामगार नोकरीच्या शोधात इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले.

● यामुळे यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागली. याचठिकाणी कारखाना पुन्हा सुरु झाल्यास, स्थानिक कामगारांना रोजगार मिळू शकेल. बंद असलेले कारखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

भांडण छोटे, कारखाना बंद

●  संचालक मंडळातील एक सदस्य व कर्मचारी यांच्या एका छोट्या भांडणामुळे हा कारखाना बंद पडला, भांडण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद केले. त्यानंतर पुन्हा हा कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र २००३ पासून हा कारखाना बंद झाला आहे. यामधील मशिनरींचा लिलाव देखील करण्यात आला आहे. देशाचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १९६९ साली कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याचे उ‌द्घाटन
झाले होते. 

●  तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. तर शंकरराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. तेव्हापासून २००३ पर्यंत हा कारखाना सुरळीत चालला. २००३ मध्ये हा कारखाना अवसायनात जाऊन सध्या पूर्णपणे बंद झालेला आहे. संभाजी उमरेकर, बालाजी घोरबांड, मारोतराव घोरबांड व तुळशीराम धावरीकर हे त्यावेळेसचे संचालक मंडळ होते. सध्या याठिकाणी एकुलता एक वॉचमन ड्युटी देत आहे.

Web Title: Sugarcane : Farmers may not be interested in sugarcane for a variety of reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.