Sugarcane Crushing : वसमत विभागातील २ सहकारी व १ खाजगी साखर कारखान्यांनी सव्वाचार महिन्यांच्या कालावधीत ८ लाख ७४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. (Sugarcane Crushing)
मार्च महिन्यात उसाचे फड संपताच कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला गेला असल्याने तिन्ही कारखान्यांचा पट्टा पडला आहे. गाळप हंगामात कधी नव्हे उसासाठी जिल्ह्याबाहेरील कारखाने सक्रिय झाले होते. उसाच्या पळवापळवीमुळे तिन्ही कारखाने उद्दिष्टपूर्तीला मुकल्यामुळे कारखान्यांना चांगलाच फटका बसला.(Sugarcane Crushing)
वसमत विभागातील पूर्णा सहकारी साखर कारखाना, टोकाई सहकारी साखर कारखाना हे दोन सहकारी व खाजगी कोपेश्वर साखर कारखाना या तिन्ही साखर कारखान्यांचा मार्च महिन्यातच पट्टा पडला आहे.(Sugarcane Crushing)
साखर कारखान्यांनी गेल्या सव्वाचार महिन्यांच्या कालावधीत ८ लाख ७४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कधी नव्हे २०२४-२५ गाळप हंगामात जिल्ह्याबाहेरील साखर कारखाने वसमत विभागात सक्रिय झाले होते.(Sugarcane Crushing)
जिल्ह्याबाहेरील कारखान्यांनी तिन्ही साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त दराचे आमिष दाखवून उसाची पळवापळवी केली. त्यामुळे या भागातील तिन्ही कारखान्यांना उद्दिष्टपूर्ती करता आली नाही. (Sugarcane Crushing)
परिणामी कारखान्यांना फटका बसला आहे. 'पूर्णा'ने ३ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करत ३ लाख ८९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. कोपेश्वर साखर कारखान्याने ३ लाख ५३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले तर टोकाई कारखान्याने १ लाख २३ हजाराचे गाळप पूर्ण केले आहे.
बाहेरील साखर कारखान्यांबरोबर गूळ कारखान्यांनीही उसावर चांगलाच हात मारला आहे. गाळप हंगामात या सर्व प्रकारामुळे साखर कारखान्याच्या गाळप उद्दिष्टीला चांगलाच खोडा बसला. (Sugarcane Crushing)
उसासाठी लागवड खर्च लागत आहे. उत्पादनवाढीसाठी खताचे नियोजन करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी खर्चही तसाच लागतो. उसाचा एकरी उतारा पाहता सद्यः स्थितीत मिळत असलेला दर परवडणारा नाही. उसाला समाधानकारक दर मिळाला तर बरे होईल. - बालाजी दळवी, शेतकरी
पूर्णा कारखान्याचे ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप उद्दिष्ट होते; परंतु कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची बाहेरील कारखान्यांनी पळवापळवी केली. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती करता आली नाही. ३ लाख ९९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करत कारखान्याने ३ लाख ८९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. - केशव आकुसकर, 'पूर्णा' कार्यकारी संचालक
टोकाई सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगामास उशिरा सुरुवात केली होती. १० मार्चपर्यंत १ लाख २३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस संपताच गाळप हंगाम बंद करण्यात आला. भविष्यात गाळपासाठी नियोजनबद्ध तयारी केली जाईल. - प्रल्हाद गायकवाड, 'टोकाई' कार्यकारी संचालक