Sugarcane Crushing : नांदेड शेजारील जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र घटल्याने आता खासगी कारखानदारांनी ऊस पळवापळवी सुरू केली आहे. यंदा नांदेड जिल्ह्यातून लातूरसह बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस नेला आहे. (Sugarcane Crushing)
कारखानदारांमधील या स्पर्धेचा शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. चारशे ते पाचशे मे.टन ऊस परजिल्ह्यात गेला आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस जिल्ह्याबाहेर गेला आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक कारखान्यांना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत घेऊन जाण्याबरोबरच अधिकचा भाव देण्याचे नियोजन करावे लागणार आहे. (Sugarcane Crushing)
नांदेड जिल्ह्यात एक सहकारी आणि पाच खासगी असे एकूण सहा कारखाने आहेत. त्याचबरोगर गुन्हाळांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. (Sugarcane Crushing)
उसाची लागवड सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत होते. त्यावेळी शेतकी अधिकाऱ्यांकडून त्याची नोंद घेऊन ऊस नेण्यासाठी तारखा दिल्या जातात. वेळेत ऊस गेला तर वजन योग्य भरतो.
परंतु, ऊस जास्त दिवस रानात राहिला तर उसाचे वजन घटून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे वेळेवर ऊस जावा म्हणून अनेकवेळा शेतकऱ्यांना कारखान्याचे कर्मचारी अथवा शेतकऱ्यांना विनवण्या कराव्या लागतात.
जिल्ह्यातील काही कारखान्यांनी सप्टेंबरमध्ये नोंद घेतलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तसाच ठेवून ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या उसात टोळ्या, मशीन अगोदर पाठविल्या; पण लातूरसह परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांतील कारखान्यांनी आपल्या टोळ्या आणि ऊस काढणीच्या मशीन नांदेड जिल्ह्यात पाठविल्याने ऊस उत्पादकांना पर्याय उपलब्ध झाला. (Sugarcane Crushing)
परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी सभासद असलेल्या कारखान्यांना ऊस न देता परजिल्ह्यांतील कारखान्यांना ऊस देणे पसंत केले. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांना गतवर्षीएवढेदेखील ऊस गाळप होणार नाही, असे चित्र आहे.
सर्वच कारखान्यांनी २५०० ते २७०० रुपये भाव दिला आहे. गुळासाठी मात्र १८०० ते २००० रुपयेप्रमाणे ऊस नेण्यात आला. दरम्यान, गतवर्षीच्या हंगामाअखेर नांदेड जिल्ह्यात १९ लाख ४७ हजार २३६ मे. टन ऊसाचे गाळप सहा कारखान्यांनी केले होते. (Sugarcane Crushing)
यामध्ये सर्वाधिक ५ लाख ४२ हजार ३०४ मे.टन श्री सुभाष शुगर हदगाव, त्यापाठोपाठ भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने ४ लाख ७५ हजार ६१९ मे.टन गाळप केले होते. आजघडीला जिल्ह्यात १७ लाख ३६ हजार ६६८ मे.टन गाळप झाले आहे. यामध्ये श्री सुभाष शुगरचे जवळपास साडेचार लाख मे.टन तर भाऊरावचे साडेतीन लाख मे. टन गाळप झाले आहे. (Sugarcane Crushing)
२ लाख ८० हजार १५३ मे. टन गाळप
मागील हंगामात २ लाख १६ हजार ४३६ गाळप करणाऱ्या व्टेंटी वन शुगर, शिवणीने यंदा फेब्रुवारीमध्येच २ लाख ८० हजार १५३ मे. टन ऊस गाळप केले आहे. हा कारखाना नांदेडात असला तरी लातूरकरांच्या मालकीचा आहे.
ऊस लागवड घटल्याचा परिणाम
शेजारील लातूरसह परभणी, हिंगोली, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र घटले आहे. सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी लातूरसह बीडचा ऊस नेला. त्यामुळे या जिल्ह्यातील कारखान्यांनी आपला मोर्चा नांदेडकडे वळविला.
त्यातूनच आता नांदेड जिल्ह्यातील कारखान्यांचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार नाही. अनेक कारखाने गाळप बंद करण्याच्या मार्गावर आहेत. दरवर्षी मे पर्यंत हंगाम चालतो. यंदा फेब्रुवारीमध्येच सोलापूर जिल्ह्यातील १५ हून अधिक कारखान्याचे गाळप बंद झाले आहे.
काट्यावर मिळाले पैसे
* जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, लोहा, उमरी आदी तालुक्यांतील ऊस परजिल्ह्यांतील कारखान्यांनी नेला आहे.
* यामध्ये लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगर, बालाघाट व्टेंटीवन शुगर, बीड जिल्ह्यातील योगेश्वरीसह अन्य एक, परभणीतील जी ७ शुगर, हिंगोली जिल्ह्यातील टोकाई सहकारी साखर कारखाना आदी कारखान्यांनी यंदा ऊस नेला.
* जवळपास चारशे ते पाचशे मेट्रिक टन ऊस बाहेरील कारखान्यांना गेला असल्याचा अंदाज बांधला जात आहे. यामध्ये सर्वाधिक ऊस लातूरकरांची मालकी असलेल्या कारखान्यांनी नेला.
* कारखानदारांच्या या स्पर्धेत अनेक शेतकऱ्यांना काट्यावरच पैसे मिळाले तर काही ठिकाणी चार ते आठ दिवसांत बिले देण्यात आली.
कर्नाटकमधील यंत्रणा, मजूर नांदेडात
* टोकाई सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन बदलल्याने कारखान्याने कात टाकली आहे.
* कर्नाटक येथील हंगाम जानेवारीमध्ये संपल्याने तेथील टोळ्या, मशीन नांदेडात कामाला लावून टोकाई कारखान्याने अर्धापूर, नांदेड, मुदखेड तालुक्यांतील ऊस नेला. त्याचबरोबर भावदेखील चांगला दिला.
* ऊस वेळेत जात असल्याने शेतकऱ्यांनी कारखाना कोणता हे पाहिले नाही. त्यामुळे मेपर्यंत चालणारा हंगाम मार्चअखेर बंद होईल, असा अंदाज आहे.
हे ही वाचा सविस्तर : Bhavantar Yojana : शासनाची भावांतर योजना शेतकऱ्यांसाठी शिमगा वाचा सविस्तर