देशात २०२५-२६ चा साखर हंगाम अनुकूल आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाढलेली ऊस लागवड आणि केंद्र सरकारकडून वेळेवर वाढ केलेली रास्त आणि किफायतशीर किंमत यामुळे साखरेचे एकूण उत्पादन ३५० लाख टनापर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने व्यक्त केले आहे. आतापर्यंत एकूण साखर उत्पादन २५८.२० लाख टन इतके झाले असून, ते गेल्या वर्षी झालेल्या ३१६.३५ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत ५८ लाख टन अर्थात १८.३८ टक्क्यांनी कमी झाले आहे.
मात्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत विशेष गाळप हंगाम चालू राहणार आहे. कर्नाटकातील सात आणि तमिळनाडूतील नऊ कारखाने सप्टेंबरअखेर चालू राहिल्याने देशातील साखर उत्पादन २६१ लाख टनांपर्यंत होईल, असा अंदाज आहे.
साखर निर्यात कोटा घोषित झाल्यानंतर एक्स मिल साखरेचा दर प्रतिक्विंटल जवळपास ३ हजार ९०० रुपये राहिला आहे. मात्र, मेच्या मध्यात त्यात घसरण झाली. सणासुदीचा काळ सुरू झाल्याने साखरेची मागणी वाढेल. त्यामुळे किमती स्थिर राहतील, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे २० टक्क्यांचे उद्दिष्ट भारताने २०३० या निर्धारित कालावधीपेक्षा पाच वर्षे अगोदरच साध्य केले आहे. देशाने २०१४ मध्ये केवळ १.५ टक्के इथेनॉल मिश्रणावरून १० वर्षांत २० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.
देशातील सहकारी साखर क्षेत्रात धोरणात्मक बदल होत आहेत. हे धोरण सहकार क्षेत्राला नवीन ताकद देईल. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
राज्य सरकारनेही २३ जुलै रोजी राज्यभरात मल्टी-फीड डिस्टिलरीची स्थापना आणि ऑपरेशनला मान्यता दिली. हा निर्णय राष्ट्रीय जैवउर्जा धोरण आणि इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाशी सुसंगत असल्याने २०३०पर्यंत ३० टक्के मिश्रण आता शक्य होणार आहे. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
अधिक वाचा: ऊस लागवड करताय? ८६०३२ पेक्षा जास्त उत्पादन व साखर उतारा देणारी 'ही' जात निवडा