Join us

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात साखर उत्पादन घटणार; यंदा किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 11:48 IST

Sugar Production 2024-25 यंदा ऊस गाळप हंगाम शेवटाकडे जात असून, देशभरात आतापर्यंत ७७, तर राज्यात ३० कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली आहे.

यंदा ऊस गाळप हंगाम शेवटाकडे जात असून, देशभरात आतापर्यंत ७७, तर राज्यात ३० कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली आहे.

देशात आतापर्यंत १९७.६५ लाख टन, तर राज्यात ६८.१० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षाशी तुलना केल्यास देशातील साखर उत्पादनात २७ लाख टन, तर राज्याच्या साखर उत्पादनात ११ लाख टनांनी घट झाली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार देशात २७० लाख टन उत्पादन अपेक्षित असून, गेल्या वर्षाच्या ३१९ लाख टनांच्या तुलनेत त्यात ४९ लाख टन घट होऊ शकते.

राज्यात गेल्यावर्षी ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा त्यात २४ लाख टनांनी घट होऊन ते ८६ लाख टन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे साखर उत्पादनात पहिला क्रमांक असलेला महाराष्ट्र यंदा दुसऱ्या क्रमांकावर राहणार आहे.

देशातील एकूण ५३१ कारखान्यांपैकी ४५४ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. यंदा १५ फेब्रुवारीअखेर यापैकी ७७ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

देशभरात आतापर्यंत २ हजार १७५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर साखर उत्पादन १९७.६५ लाख टनापर्यंत झाले असून, गेल्यावर्षी याच तारखेला २२४.७५ लाख टन झाले आहे.

यंदा त्यात २७.१० लाख टनांची घट झाली आहे. देशभरात सरासरी साखर उतारा केवळ ९.०९ टक्केच मिळाला असून, तो गेल्या ९.८७ टक्के होता. यंदा त्यात ०.७८ टक्क्यांनी घट झाली आहे.

यंदा साखर उत्पादन २७० लाख टन राहण्याचा अंदाज असून, गेल्यावर्षीच्या ३१९ लाख टन साखरेच्या तुलनते त्यात सुमारे ४९ लाख टनांची घट येण्याची शक्यता असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशातील ११९ पैकी २ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला असून, ६८० लाख टन ऊस गाळपातून सरासरी ९.३० टक्के उताऱ्याने ६३.२५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. 

३७ लाख टन इथेनॉलसाठीहंगामाअखेर ९३ लाख टन होण्याचा अंदाज आहे. राज्यात २०० पैकी १७० कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असून ३० कारखान्यांनी गाळप हंगाम बंद केला आहे. आतापर्यंत ७४० लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी ९.२० टक्के उताऱ्याने ६८.१० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यंदा महाराष्ट्रातील साखर उत्पादन ८६ लाख टन होणार आहे. ३७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविली जाणार आहे.

स्थानिक बाजारातील विक्री दर समाधानकारक राहण्याची अपेक्षा असून, कारखान्यांना ऊस उत्पादकांची देणी भागविणे शक्य होईल. साखरेच्या किमान विक्री दरात तसेच साखर उद्योगातून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीदरात वाढ झालेली नाही. ती झाल्यास कारखान्यांचे अर्थचक्र सुधारण्यास मदत होणार आहे. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

अधिक वाचा: Sugarcane FRP 2024-25 : 'एफआरपी'चे १३ हजार ९८२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतीमहाराष्ट्रउत्तर प्रदेशबाजारभारत