Pune : राज्यातील साखर कारखाने (Surag Factories) सुरू होऊन एक महिना उलटला आहे. तर आत्तापर्यंत राज्यातील जवळपास १८६ साखर कारखान्यांनी गाळपाला सुरूवात केलेली आहे. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्यामुळे साखरेचे उत्पादन किती होणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर विस्मा (वेस्ट इंडियन शुगर मिल असोशिएशन) यांनी साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवला आहे.
चालू गाळप हंगामात १८ डिसेंबरपर्यंत सहकारी ९४ व खाजगी ९२ असे राज्यातील एकूण १८६ साखर कारखान्यांनी २३३.६७ लाख टन ऊसाचे गाळप करून १९.२६ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. साखरेचा सरासरी उतारा ८.२४ टक्के इतका राहिला. सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभाग ९.६८, पुणे- ८.३४, नांदेड- ८.३४, अमरावती- ७.८८, अहमदनगर- ७.६२, सोलापूर- ७.३३, छत्रपती संभाजीनगर - ६.८९, नागपूर विभाग - ५ इतका आहे.
विभागनिहाय सर्वाधिक ऊस गाळप पुणे विभागामध्ये ५९.६६ लाख टन तर दुसऱ्या स्थानावर कोल्हापूर विभाग ५३.११ लाख टनावर आहे. राज्यातील चालू गाळप हंगामाकरीता शेतामधील ऊस पिकाचा विभागनिहाय आढावा घेतला असता, एप्रिल ते जुनमधील अवर्षण व तद्नंतर नोव्हेंबरपर्यंत अति पर्जन्यवृष्ठीमुळे ऊसाची लवकर पक्वता, ऊसाला तुरा येणे, ऊसाची वाढ कमी होणे, परिणामी हेक्टरी उत्पादन कमी झाल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे राज्यातील सरासरी साखरेचा उतारासुध्दा गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा कमी राहण्याची शक्यता आहे.
चालू गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये १०० ते १०२ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचे अनुमान आहे. त्यामधील १२ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविण्याचा अंदाज आहे. अशाप्रकारे एकूण निव्वळ ९० लाख टन साखर उत्पादन होईल असा अंदाज विस्माने बैठकीत वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यातील स्थानिक बाजारपेठेतील साखरेचे दर ३३०० ते ३४०० प्रती क्विंटल हे सरासरी ३५०० ते ३६०० दरापेक्षा मोठ्या प्रमाणात कमी असल्याचे दिसून येत आहेत. सध्या उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीमध्ये साखर विकी करावी लागत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी उत्पन्न साखर विकीमधून मिळत असल्याने कारखान्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्याकरीता केंद्र शासनाने साखर उदयोगाच्या हितास्तव तातडीने साखरेची किमान विकी किंमत ४१ रू. प्रती किलो पेक्षा जास्त करण्याची मागणी करण्यात आली.
गाळप हंगाम २०२४-२५ करीता ऊसाची किमान खरेदी किंमत (FRP) मध्ये वाढ झाल्याने साखर उत्पादन त्याचबरोबर इथेनॉल उत्पादनाच्या खर्चामध्ये वाढ झाली असल्याने साखर, ऊसाचा रस, बी हेवी, सी हेवी पासून तयार होणाऱ्या इथेनॉलकरीतासुध्दा खरेदी किंमतीमध्ये शासनाने सुधारीत दर किमान ३ ते ५ रूपये प्रती लिटर वाढ करण्याबाबत सभेमध्ये आग्रही मागणी करण्यात आली.
इथेनॉल वर्ष २०२४-२५ करीता तेल कंपन्याकडून दिनांक ०६ डिसेंबर, २०२४ रोजी प्रसिध्द झालेल्या इथेनॉल निविदामध्ये सहकारी साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या इथेनॉल पुरवठ्याकरीता प्राधान्य देण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. खाजगी कारखान्यांकडून उत्पादित होणारे इथेनॉल तिसऱ्या क्रमांकाच्या प्राधान्यक्रमाने खरेदी केले जाईल असे नमूद केले आहे.
ही बाब खाजगी साखर उद्योगाकरीता मोठ्या संकटाची चाहूल असल्याने याबाबत विस्माच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली व अशा प्रकारच्या प्राधान्यक्रमाबाबत सर्व उपस्थितांनी चिंता व्यक्त केली. याबाबत शासनाकडे निवेदन सादर करून/पाठपुरावा करून अशा प्रकारच्या जाचक अटींमधून सवलत मिळणेकरीता विस्माने पुढाकार घेवून सदरच्या अटी व शर्ती वगळण्याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले.