Join us

गेली वर्षभर बाजारातील साखरेचे दर स्थिर; यंदा उसाला पहिली उचल प्रतिटन ३४०० शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:36 IST

Sugarcane FRP 2025-26 गेल्यावर्षी गाळप कमी झाल्याने साखर कारखान्यांना फटका बसला होता. यंदा, उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उसाच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने कितपत उतारा पडतो, त्यावर गाळपाचे दिवस अवलंबून राहणार आहे.

कोल्हापूर : गेली वर्षभर साखरेचा घाऊक बाजारातील दर प्रतिक्विंटल ३९०० रुपयांपर्यंत स्थिर राहिला आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात उसाची पहिली उचल प्रतिटन ३,३०० ते ३,४०० रुपये, तर उर्वरित रक्कम अंतिम हिशेबानंतर मिळू शकते.

गेल्यावर्षी गाळप कमी झाल्याने साखर कारखान्यांना फटका बसला होता. यंदा, उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उसाच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने कितपत उतारा पडतो, त्यावर गाळपाचे दिवस अवलंबून राहणार आहे.

यंदा उसाची १०.२५ टक्के उताऱ्याला ३,५५० रुपये एफआरपी निश्चित केली आहे. त्यापुढे प्रत्येक टक्क्याला ३५५ रुपये मिळणार आहेत. यावर्षी साखरेचा घाऊक बाजारातील दर प्रतिक्विंटल ३९०० रुपयांवर स्थिर राहिला आहे.

एक टन ऊस गाळपातून किमान १२० किलो साखरेचे उत्पादन गृहीत धरले तर साखरेतून ४,६८० रुपये मिळू शकतात. त्याशिवाय इतर उपपदार्थ उत्पादनातून प्रतिटन किमान ७०० रुपये उत्पन्न मिळू शकते.

असे ५,३८० रुपयांमधून सरासरी प्रतिटन ८५० रुपये ऊस तोडणी व वाहतूक खर्च वजा जाता कारखान्यांच्या हातात ४,५३० रुपये राहतात.

त्यातून साखर उत्पादन खर्च प्रतिटन ११०० रुपये गृहीत धरला तरी ३,४३० रुपये शिल्लक राहू शकतात. त्यामुळे यंदा प्रतिटन ३३०० ते ३४०० रुपये पहिली उचल मिळू शकते.

'स्वाभिमानी'च्या ऊस परिषदेकडे लक्ष◼️ स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद १६ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होत आहे. एकरकमी एफआरपीविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.◼️ त्याचे पडसाद या परिषदेत उमटणार असून, उसाचा वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील साखरेचा भाव पाहता, 'स्वाभिमानी'ची पहिल्या उचली मागणी किती राहणार? याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

यंदा साखरेचे दर चांगले असून, विशेष म्हणजे वर्षभर स्थिर राहिले आहेत. रासायनिक खतांसह उसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने किमान साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि त्यानंतर अंतिम दर देण्यास कारखानदारांना काहीच अडचण नाही. - शिवाजी माने, नेते, जय शिवराय शेतकरी संघटना

अधिक वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजनेतील १ लाख अनुदानाची मर्यादा काढली; आता असे मिळणार अनुदान

English
हिंदी सारांश
Web Title : Stable Sugar Prices; ₹3400/Ton Initial Sugarcane Price Possible This Year

Web Summary : Sugar prices stable for a year, ₹3400/ton initial sugarcane price possible. Production costs factored in, 'Swabhimani' sugarcane conference eyes increased rates. Farmer organizations advocate for fair pricing amid rising expenses.
टॅग्स :साखर कारखानेऊससरकारबाजारमार्केट यार्डस्वाभिमानी शेतकरी संघटनाउच्च न्यायालयन्यायालयशेतकरीशेती