Pune : राज्यातील गाळप हंगाम संपून काही दिवस उलटले तरीही राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अद्याप १०० टक्के एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केली नाही. त्यानिमित्त आज साखर आयुक्तांनी एफआरपी थकीत असलेल्या साखर कारखान्यांची सुनावनी घेतली असून येणाऱ्या २० मे च्या आत शेतकऱ्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी थकवली आहे. त्याबरोबरच ओंकार शुगर ग्रुपने कोट्यावधींची एफआरपी थकवल्याची माहिती समोर आली असून यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी आणि अनेक नेत्यांनी याबाबत साखर आयुक्तांकडे धाव घेतली होती.
मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची एफआरपी थकीत असल्यामुळे साखर आयुक्तांनी आज आयुक्त कार्यलयात सुनावणी घेतली. यावेळी जवळपास ५० पेक्षा जास्त साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. थकीत एफआरपी २० मे च्या आज जमा करा अन्यथा आरआरसी कारवाई करण्यात येईल अशा सूचना साखर आयुक्तांनी कारखान्यांना दिल्या आहेत.
अनेक साखर कारखान्यांची साखर विक्री, इथेनॉल विक्री होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्याबरोबरच केंद्र सरकारने साखरेचे दरही वाढवले नसल्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. यामुळेच ऊस गेल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांचे पेमेंट करणे कारखान्यांना शक्य होत नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
