Join us

साखर कारखान्यांना २५ किलोमीटरचे कार्यक्षेत्र मग वाहतुकीसाठी खर्च अधिक कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 17:54 IST

राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपातील ४० ते ६० टक्के ऊस कार्यक्षेत्राबाहेरील गाळप करत असल्याने ऊस तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ वाढ केली जाते.

कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळपातील ४० ते ६० टक्के ऊस कार्यक्षेत्राबाहेरील गाळप करत असल्याने ऊस तोडणी वाहतुकीमध्ये भरमसाठ वाढ केली जाते.

साखर कारखान्यांना २५ किलोमीटरचे कार्यक्षेत्र निश्चित करून दिले, मग त्यापेक्षा अधिक वाहतूक खर्च कसा? २५ किलोमीटर ऊस तोडणी व वाहतुकीसाठी प्रतिटन ८२२ रुपये कमिशनसह घेतले पाहिजे.

त्यावरील दर संबंधित कारखान्यांकडून वसूल करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांच्याकडे केली. कारखानदारी तोट्यात जाऊ नये म्हणून दोन साखर कारखान्यांमध्ये २५ किलोमीटर अंतराची अट घातली आहे.

दुसरीकडे साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढले असल्याचा बोगस अहवाल राज्यातील बहुतांशी कारखान्यांनी दाखवून कारखान्याची गाळप क्षमता वाढवून घेतली आहे.

साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र तेवढेच असून उत्पादनात नगण्य वाढ झालेली आहे हे माहिती असतानाही कारखान्यांनी चुकीची आकडेवारी सादर करून गाळप क्षमता वाढवून घेतली आहे.

यामुळे जवळपास १०० ते १२० किलोमीटर अंतरावरून ऊस गाळप केला जात असून यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यापुढे राज्यातील कोणत्याही साखर कारखान्यांना गाळप परवाने वाढविण्याची परवानगी देऊ नये.

शेतकऱ्यांचे प्रतिटन १६० रुपयांचे नुकसानसाखर कारखाना कार्यक्षेत्रातील २५ किलोमीटर मधील गाळपास आलेल्या उसास कमिशनसह वाहतुकीचा दर प्रतिटन ३८२ रुपयांपर्यंत आकारला जात असून २५ किलोमीटर ते ५० किलोमीटर पर्यंत सरासरी ५४२ रुपयांपर्यंत वाहतुकीचा दर दिला जातो. यामुळे प्रतिटन जवळपास १६० रुपयांचा कारखाना कार्यक्षेत्रातील गाळप होणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिटन नुकसान होत आहे.

अधिक वाचा: मागील गाळप हंगामासाठी या साखर कारखान्याने उसाचा अंतिम हप्ता केला जाहीर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतीशेतकरीकोल्हापूरराजू शेट्टीस्वाभिमानी शेतकरी संघटना