Pune : राज्यात यंदा १ नोव्हेंबरपासून साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केले होते. गाळपासा सुरूवात होऊन आत्ता सव्वा महिना उलटला तरी राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरू केलेले नाही. यंदाच्या हंगामात कमी साखर कारखाने गाळपासाठी असून यामुळे साखर हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, यंदा अनेक साखर कारखान्यांचे गाळप उशिराने सुरू झाले. पहिल्या महिन्यात केवळ दीडशेच्या आसपास साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. पण त्यानंतरही गाळप सुरू होण्याचा वेग संथ दिसत असून साखर आयुक्तालयाने दिलेल्या अद्ययावत माहितीनुसार आत्तापर्यंत केवळ १८१ साखर कारखान्यांनी गाळपाला सुरूवात केलेली आहे.
मागच्या वर्षी याच काळापर्यंत १८९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. तर यावर्षी ही संख्या कमी आहे. सध्या राज्यात ९० सहकारी आणि ९१ खासगी साखर कारखान्यांनी गाळपाला सुरूवात केली आहे. तर मागच्या वर्षी याच वेळेत ९४ सहकारी आणि ९५ खासगी असे मिळून १८९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते.
पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन जास्त झाले आहे. ८ डिसेंबर रोजी प्राप्त झालेल्या माहितीनुसार ३ कोटी ७ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले असून २ कोटी ५१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यासोबत आत्तापर्यंतची सरासरी उतारा हा ८.१९ एवढा आला आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा साधारणपणे २१५ साखर कारखान्यांनी गाळपाच्या परवान्यासाठी अर्ज केले होते. तर त्यातील १८१ साखर कारखाने सुरू झाले आहेत. मागच्या हंगामात २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले होते. त्याच्या आधीच्या हंगामात २०८ साखर कारखाने होते पण यंदा त्या तुलनेत अजूनही २७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणे बाकी आहे.
कोणत्या विभागात किती साखर कारखाने सुरू?
- कोल्हापूर - ३५
- पुणे - २८
- सोलापूर - ४१
- अहिल्यानगर - २४
- छत्रपती संभाजीनगर - २०
- नांदेड - २९
- अमरावती - ४
- नागपूर - ०
