बाळकृष्ण पुरोहित
भेंडा : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला. गळीत हंगाम सुरू असताना अनेक शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी मुकादमांकडे विनवण्या कराव्या लागतात मात्र, शेतकऱ्यांची विविध कारणांनी अडवणूक होते.
तक्रार केली तर दखल घेतली जात नाही. यासाठीच साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांना तक्रार निवारण अधिकारी नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
प्रत्येक सहकारी व खासगी साखर कारखान्यात तक्रार निवारण अधिकारी अनिवार्य, आलेल्या तक्रारीची ७ दिवसांत चौकशी बंधनकारक, संबंधित अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक कारखान्यांच्या व ग्रामपंचायतींच्या फलकावर प्रकाशित करणे.
चौकशीत दोषी आढळल्यास मुकादमाच्या बिलातून रक्कम वसूल करून शेतकऱ्यांना देणे, तक्रार निवारण न झाल्यास प्रादेशिक सहसंचालकांना ई-मेलने तक्रार करता येणार आहे.
घटना घडल्यानंतर शेतकऱ्यांनी लेखी तक्रार देऊन पोच घेणे आवश्यक असल्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी आदेशात नमूद केले आहे.
तक्रार निवारण अधिकारी नेमणेबाबत साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कारखाना व्यवस्थापनाने सुरेश आहेर यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. - अनिल शेवाळे, कार्यकारी संचालक, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा
अधिक वाचा: सोमेश्वर कारखान्याकडून चालू गळीत हंगामासाठी पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर?
