राहिद सय्यद
लोणंद : मनात शेतीची आवड असेल तर कोणतेही अडथळे येत नाहीत. आता हेच दाखवून दिले आहे ते लोणंद नगरपंचायतीचे कर्मचारी दयानंद क्षीरसागर यांनी.
ते १० गुंठे झेंडू आणि १० गुंठे शेवंतीच्या लागवडीतून दसरा-दिवाळी दरम्यानच्या चार महिन्यात तब्बल अडीच लाख रुपये कमावतात. त्यांचा हा आदर्श इतर शेतकऱ्यांपुढेही मार्गदर्शक ठरणारा आहे.
लोणंद येथील दयानंद नामदेव क्षीरसागर हे नगरपंचायतीत कर्मचारी आहेत. त्यांची लोणंद हद्दीत जमीन आहे. त्यामुळे नोकरी करत ते शेती पाहतात. त्यांनी झेंडूत अष्टगंधा आणि पितांबरी तसेच शेवंतीमध्ये भाग्यश्री जातीची लागवड केली आहे.
झेंडूची लागवड वर्षभर करता येते. लागवडीनंतर अंदाजे आठ आठवड्यांत फुलांचे उत्पादन सुरू होते. योग्य नियोजन व मध्यम हवामानात लागवड केल्यास फुलांचे दर्जेदार उत्पादन मिळते.
शेवंतीसाठी जून-जुलै महिने सर्वोत्तम मानले जातात. दयानंद क्षीरसागर यांनी गादीवाफा पद्धत, ठिबक सिंचन व मल्चिंगचा वापर करून रोपांची वाढ आणि उत्पादन वाढवले आहे.
क्षीरसागर म्हणतात, फूल शेतीसाठी योग्य मातीची निवड व सुपीक खत वापरणे महत्त्वाचे असते. रोपांची काळजी घेतल्यास उत्पादन सातत्याने मिळत राहते.
किलो ७० ते १०० रुपये
अतिवृष्टी व खराब हवामानामुळे फूल शेतीवर परिणाम झाला. दयानंद क्षीरसागर यांनी नवीन वाणाचा प्रयोग करून नुकसान कमी केले. झेंडू, शेवंतीला किलोला ७० ते १०० रुपये दर मिळत आहे. या हिशोबाने १० गुंठे झेंडू आणि १० गुंठे शेवंती फूल शेती करून त्यांना किमान अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे.
झेंडूच्या रोपांना पावसाचा फटका बसला. पण, चांगली निगा राखल्याने उत्पादन टिकवता आले. आता दर वाढला तर तोटा भरून निघेल. त्याचबरोबर शेवंतीचे नुकसान झाले आहे. तरीही ठिबक सिंचन व मल्चिंगमुळे बरीच रोपे वाचली आहेत. अशा फूल शेतीतूनही चांगले अर्थार्जन करता येते हे दिसले आहे. - दयानंद क्षीरसागर, लोणंद
अधिक वाचा: तुकडेबंदीखालील रखडलेले जमिनीचे व्यवहार होणार सुलभ; कुणाला कसा होणार फायदा? वाचा सविस्तर