Join us
Daily Top 2Weekly Top 5

Summer Bajara आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरी पीक बहारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 11:22 IST

आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही बाजरी काही भागात फुलोन्यात तर काही ठिकाणी काढणीला आली आहे. बाजरीची राखण केली जात असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही बाजरी काही भागात फुलोऱ्यात तर काही ठिकाणी काढणीला आली आहे. बाजरीची राखण केली जात असल्याचे चित्र जागोजागी दिसून येत आहे.

पूर्वी पावसाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. मात्र निसर्गचक्राच्या बदलाने आता सर्वच ठिकाणी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते. कमी पाण्यात येणारे व हमखास उत्पन्न मिळवून देणारे बाजरी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

शिवाय खाण्यासाठी बाजरी व सरमाडाचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठी होत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळतो. आंबेगाव तालुक्याचा विचार केला तर पश्चिम आदिवासी पट्टा वगळता उर्वरित तालुक्यातील बहुतेक ठिकाणी उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते.

शेतातील बटाटा पिकाची काढणी झाल्यानंतर बीमोड करण्यासाठी शेतकरी हमखास उन्हाळी बाजरीचे पीक घेतो, घोड नदीला बारमाही पाणी असल्याने व कालव्याद्वारे सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने आंबेगाव तालुक्यात उन्हाळी बाजरीचे क्षेत्र वाढले आहे.

तालुक्यातील मंचर, घोडेगाव, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग, पिंपळगाव, काठापूर, पारगाव, नारोडी, अवसरी, रांजणी, शिंगवे, थोरांदळे या परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात बाजरी पीक घेतलेले दिसते, शेतकरी हायब्रीड वाण व सुधारित वाण या बाजरीचे उत्पादन घेताना दिसतो.

८५ ते ९५ दिवसांत येणारे बाजरी पीक कमी पाण्यात येणारे व हमखास उत्पादन मिळवून देणारे आहे. या पिकाला बियाणे, खुरपणी व थोडेसे खत इतकाच खर्च येतो. उन्हाळी बाजरीची राखण करावी लागते, सकाळच्या प्रहरी लवकर जाऊन बाजरी राखावी लागते.

मात्र, शेतकरी हे काम तिसऱ्या हिस्स्याने दुसऱ्यांना देतो, बाजरीचे जे उत्पादन निघते. त्याचा तिसरा हिस्सा राखण करणाऱ्यांना दिला जातो. त्यामुळे बाजरी काढण्याचे काम राखण करणारी व्यक्ती करून देते. सध्या उन्हाळी बाजरी पीक फुलोऱ्यात आले असून, तिचे राखणीचे काम केले जात आहे तर काही ठिकाणी बाजरी काढण्याचे काम सुरू झाले आहे.

या पिकाला इतर पिकांपेक्षा कमी पाणी लागते. जमिनीच्या प्रतवारीनुसार तीन ते पाचवेळा पाणी भरावे लागते. खत व तण व्यवस्थापन तसेच व्यवस्थित निगा राखल्यास संकरित बाजरीचे काही ठिकाणी तीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते, अशी माहिती महेश मोरे यांनी दिली.

अधिक वाचा: Soil Testing उभ्या फळबागेतील मातीचा नमुना कसा घ्याल?

टॅग्स :बाजरीआंबेगावशेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनपाणी