Join us

मोठी मागणी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या जांभूळ शेतीचा माजी मुख्यमंत्र्यांच्या शेतात यशस्वी प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:21 IST

White Jamun Fruits : आजवर आपण काळ्या-जांभळ्या रंगांची जांभूळ फळे पाहिली-खाल्ली आहेत परंतु अकलूज (जि. सोलापूर) येथे पांढऱ्या रंगाच्या जांभूळ शेतीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.

आजवर आपण काळ्या-जांभळ्या रंगांची जांभूळ फळे पाहिली-खाल्ली आहेत परंतु अकलूज (जि. सोलापूर) येथे पांढऱ्या रंगाच्या जांभूळ शेतीचा जिल्ह्यातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शेतात थाई (थायलंड) ची पांढरे जांभूळ या वाणाच्या झाडांना पांढरी जांभळे लगडली आहेत. मोठ-मोठ्या शहरांतून या नवख्या जांभळास चांगली मागणी असून हा औत्सुक्याचा विषय बनला आहे.

मागील काही वर्षापूर्वी जम्बो जांभूळ या वाणाच्या जांभळाची शेती काही शेतकऱ्यांनी केली होती, परंतु पुढे त्यामध्ये फारसे यश आले नाही. अशा परिस्थितीत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सन २०२२ मध्ये आपल्या सव्वा एकर क्षेत्रात १५ बाय १२ फूट एवढे अंतर ठेवून २८४ थाई पांढऱ्या जांभळाची रोपे लावली. पहिल्या वर्षापासून जांभळे लागायची.

यंदा तिसऱ्या वर्षी या जांभळाची झाडे फळांनी चांगलीच लगडली असून त्यांना प्रति झाड ४० ते ५० किलो एवढे पांढरे जांभूळ मिळण्याची अपेक्षा आहे. पाचव्या वर्षापासून प्रति झाड १०० किलोपेक्षा जास्त जांभूळ उत्पादन देईल, असे विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. या जांभळास मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर आदी मोठ्या शहरांमध्ये मागणी आहे. स्थानिक पातळीवर हे पांढरे जांभूळ औसुक्याचा विषय बनले आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शेतात लावलेली पांढऱ्या रंगाची जांभूळ हा वाण थायलंडमध्ये विकसित झाला आहे. त्याची रोपे ओरिसा येथून शंभर रुपये प्रतिरोपप्रमाणे मिळाली. जांभळाच्या ह्या वाणास अतिशय कमी प्रमाणात कीटक व बुरशीनाशके लागतात. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात बहार धरला की तो एप्रिलअखेरीस काढणीस येतो. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात याला चांगली मागणी व चव असते. झाडाची छाटणी करण्याची आवश्यकता नाही. केवळ उंची जांभळं तोडण्याएवढी मर्यादित ठेवण्याची कसरत करावी लागते. - रणजित पाटील, कृषितज्ज्ञ, दहिगाव.

आम्ही सोमवारी २०० किलो पांढरी जांभळे पुणे येथील मार्केटला पाठविली होती. त्यास सुमारे दोनशे रुपयांप्रमाणे दर मिळाला आहे. झाडावरती आणखी गाभोळी व कच्ची जांभळे मोठ्या प्रमाणात आहेत. ती लवकरच काढणीस येतील. त्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याने याला खूप महत्त्व आहे. - विजयसिंह मोहिते-पाटील माजी उपमुख्यमंत्री, अकलूज.

हेही वाचा : गोटखिंडी येथील थोरात बंधूंनी घेतला आधुनिक शेतीचा ध्यास; केळीतून वर्षाला घेताहेत ६० लाखांचं उत्पन्न

टॅग्स :फळेशेतकरीशेतीफलोत्पादनबाजारभाज्यामार्केट यार्डशेती क्षेत्र