पुणे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण या प्रकल्पांतर्गत उत्पादित केलेले कांदा फुले समर्थ या वाणाच्या बियाण्यांची विक्री आज करण्यात आली. केवळ तीन तासांमध्ये चार लाख पाच हजार रुपयांच्या कांदा बियाण्यांची विक्री करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी ही कमाई केली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे कृषी महाविद्यालयाकडून आपल्या फिल्डवर दरवर्षी कांदा बियाणांची निर्मिती केली जाते. या प्रक्रियेचा सर्व नियोजन विद्यार्थ्यांकडून केले जाते. यासोबतच विद्यापीठाच्या कांदा फुले समर्थ या वाणाच्या बियाण्यास शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
दरम्यान, आज (ता. २६) रोजी या वाणाचे तब्बल १६२ किलो बियाणे विक्री करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यातून तब्बल ८६ शेतकऱ्यांना हे बियाणे वाटप करण्यात आले आहे. प्रत्येकी एक ते दोन किलो बियाण्याचे वाटप करण्यात आले असून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
कृषी महाविद्यालयाकडून दरवर्षी राबविण्यात येणारा हा महत्त्वाचा उपक्रम असून या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे आणि विद्यार्थ्यांना अनुभवातून शिक्षण या अंतर्गत आर्थिक लाभ मिळतो.
यासोबतच कृषी महाविद्यालयाकडून फळे पालेभाज्या विविध पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले जाते आणि ते थेट ग्राहकांना विक्री करून यातून मिळालेला नफा विद्यार्थ्यांना वाटला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना विक्री व्यवस्थेची चांगली माहिती होते.
राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेला कांदा फुले समर्थ हा वाण शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणारा आणि जास्त टिकणारा आहे. म्हणून शेतकऱ्यांची या वाणाला मोठी मागणी असून या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनाही चांगला आर्थिक फायदा होत आहे.
मागील काही वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून दरवर्षी आम्ही विद्यार्थ्यांमार्फत शेतकऱ्यांना दर्जेदार कांदा बियाणे उपलब्ध करून देणार असल्याची माहिती प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांनी दिली.
कांदा फुले समर्थ हा वाण हा वाण ८५ ते ९० दिवसात काढणीस तयार होतो. या वाणाचा रंग लाल असून कांदे उभट गोल आकाराचे आहेत व त्यास बाजारात चांगली मागणी आहे. तसेच त्याची मान बारीक आहे. उत्पादन खरीप हंगामात २८ टन व रांगडा हंगामामध्ये ४२ टन एवढे येत असल्यामुळे शेतकऱ्यांची या वाणाचे बियाणे खरेदीसाठी खूप मागणी आहे. - डॉ. सुभाष भालेकर (प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे).