Join us

जमिनीचा पोत टिकविण्यासाठी धडपड; शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 11:17 IST

Manure : शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले, तरी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसत आहेत. यामुळे शेणखताला मागणी वाढली आहे. एक मोठी ट्रॉली शेणखतासाठी ४ ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत.

शेती पिकांना रासायनिक खतांची मात्रा दिल्यानंतर पीक जोमात येते हे खरे असले, तरी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो आणि पुढे शेतीमधून निघणारे उत्पन्नदेखील समाधानकारक मिळत नाही.

त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांची पावले पुन्हा नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीकडे वळताना दिसून येत आहेत. यासाठी शेतकरी शेणखतांचा वापर करताना दिसत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी राखलेल्या शेणखताला देखील चांगली मागणी वाढली आहे. एक मोठी ट्रॉली शेणखतासाठी ४ ते ६ हजार रुपये मोजावे लागत आहेत.

दरवर्षी गुढीपाडवा झाला की, शेतकरी नव्याने शेती नांगरट करणे, पलटी मारणे, रोटर फिरवणे, तापलेल्या शेतातून गवत, काडी वेचून एका ठिकाणी जमा करणे, अशा शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलेला असतो.

सोबतच शेतामध्ये शेणखत टाकणे, शेळ्या-मेंढ्या बसवणे अशी कामे सुरू असतात. दिवसेंदिवस रासायनिक खतांच्या किमती वाढत आहेत. महागडे खत घेण्यास शेतकरी धजावत नाहीत. तसेच रासायनिक खताने जमिनीचा पोत खराब होतो.

यामुळे बहुंताश शेतकरी आता शेणखत घालण्यास प्राधान्य देत आहेत. एकदा शेतात शेणखत टाकले की, किमान तीन वर्षे शेती चांगली पिकते, तसेच जमीन भुसभुशीत होऊन पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होतो.

१२ हजार रुपयांना शेणखताच्या दोन ट्रॉली

• अनेक शेतकरी नैसर्गिक व विषमुक्त शेती करण्यावर अधिक भर देत आहेत. त्यामुळे शेणखताला चांगली मागणी वाढली असून, शेतकऱ्यांना चांगली कमाई होते.

• १२ हजार रुपयाला शेणखताच्या दोन ट्रॉली घ्याव्या लागत आहेत.

७०० रुपये मजुरी...

शेणखताच्या वापर केल्यास परिणामी उत्पन्नातदेखील वाढ होते, असा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. एक ट्रॉली शेणखतासाठी ५ हजार रुपये आणि भरण्यासाठी ७०० रुपये मजुरी, असे किमान ५ हजार ७०० रुपये मोजावे लागतात, तर एक हायवा टिप्परसाठी २२ हजार रुपये मोजावे लागतात. स्थानिकांना शेणखत मिळत नसल्याने अनेक शेतकरी इतर ठिकाणांहून शेणखत विकत आणत आहेत.

माझ्याकडे लहान-मोठ्या १४ गायी आहेत. मुक्तसंचार गोठा असल्याने शेणखतात पालापाचोळा नसतो. या जनावरांच्या शेणखतापासून चांगली मिळकत होते. दोन वर्षांपासून शेतकरी शेणखताला मोठी मागणी करतात; परंतु पशुधन सांभाळणे अवघड झाले आहे. चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर्षी १२ ट्रॉली शेणखत विकले आहे. वर्षभरातून तीन वेळा शेणखत विक्री होते. त्यातूनच चांगली कमाई झाली आहे. - प्रवीण निगडे, शेणखत विक्रेते नीरा ता. पुरंदर जि. पुणे.

शेतीसाठी चार ट्रॅक्टर शेणखत विकत घेतले आहे. दरवर्षी शेणखताचे भाव वाढतच आहेत; परंतु रासायनिक खतापेक्षा शेणखत चांगलेच असून, एकदा शेतात टाकले की, किमान तीन वर्षे जमिनीचा पोत चांगला राहतो व उत्पन्नात वाढ होऊन पिकावर रोगराईचे प्रमाण कमी राहते. - ज्ञानेश्वर निगडे, शेतकरी, नीरा ता. पुरंदर जि. पुणे.

 हेही वाचा : रेबिज बाधित जनावरांचे दूध सेवन केल्यास रेबिज होतो का? वाचा काय सांगताहेत तज्ञ

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीसेंद्रिय खतखतेगायपीक व्यवस्थापनलागवड, मशागत