वसंत सोनवणे
महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये स्टॉबेरी बहरत आहे. महाबळेश्वर व इतर ठिकाणी मिळणारी स्टॉबेरी अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे मिळते आहे. हा प्रयोग प्रथमच या परिसरात करण्यात आला आहे.
ए. एस. के. फाउंडेशन मुंबई पुरस्कृत बायफ संचलित समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत बारी, जहागीरदार वाडी, पेंडशेत, चिचोंडी, मुरशेत, पांजरे या सहा गावात विविध प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. या परिसरातील शेतकरी समृद्ध व प्रगत करणे हा या मागचा उद्देश आहे.
अकोले तालुक्यातील पश्चिम भाग हा दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला असून डोंगर उतारावर शेती आहे. या परिसरातील प्रमुख पीक भात आहे. परंतु ए.एस. के फाऊंडेशन पुरस्कृत बायफ ही संस्था या परिसरात आरोग्य, शैक्षणिक, शेती अशा अनेक विषयावर काम करत आहे. समृद्ध किसान प्रकल्पांतर्गत विविध नवीन उपक्रम राबविण्यासाठी नितीन साठे यांनी परिश्रम घेतले.
या संस्थेच्या सहकार्याने बीजमाता राहीबाई पोपेरे, मामताबाई भांगरे सह इतर शेतकऱ्यांना या विविध उपक्रमासाठी सिद्धार्थ अय्यर, अरुण बांबळे व बाय सुधीर वागळे यांचे सहकार्य लाभत आहे. स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देताना बायफचे मुकुल बाविस्कर, सुरेश सहाणे, विष्णू चौखंडे, गोरक्षनाथ देशमुख, किरण आव्हाड, रामनाथ नवले, शिवाजी आदमाने, राम कोतवाल, योगेश नवले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
६ गावातील १८ शेतकऱ्यांनी राबवला उपकम
● स्टॉबरीला फळे जोमात आली असून फळे बाजारात दाखल झाली आहेत. भंडारदरा पर्यटनस्थळ असल्याने येणारे पर्यटक स्टॉबेरी घेत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होतो आहे.
● चालूवर्षी प्रथमच बारी, जागेदरवाडी, पेंडशेत, चिचोंडी, मुरशेत पांजरे अशा ६ गावांतील १८ शेतकऱ्यांकडे प्रकल्पाच्या सहकार्याने स्टॉबेरी पिकाची लागवड करण्यात आली. पिकांचे व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण, विक्री, व्यवस्थापन विषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हेही वाचा : Farmer Success Story : सरकारी योजनेचा मिळाला आधार; गणेशरावांनी केली आर्थिक विषमतेवर मात