दत्ता पाटीलभारतासह जगभर दर्जेदार बेदाण्याचे उत्पादन करून निर्यात करून 'बेदाण्याचे जीआय मानांकन' मिळवण्याची किमया सांगली जिल्ह्याने केली. त्यामुळे सांगली जिल्ह्याला 'बेदाण्याची पंढरी' अशी ओळख प्राप्त झाली.
मात्र, इथल्या शेतकऱ्यांच्या जिवावर, अब्जाधीश झालेल्या काही व्यापाऱ्यांना पैसे मिळवण्याचा मोह अनावर झाला. या मोहातूनच भारताबाहेरील बेदाणा सांगली-तासगावच्या नावाखाली खपवला जाऊ लागला.
त्याचा फटका उत्पादकांना बसत आहे. बागायतदार संघाने त्याचा भंडाफोड केला. 'सापडला तो चोर' या न्यायाने कारवाई झाली. आजवर अनेक व्यापाऱ्यांनी
बेकायदेशीर कारनामे सुरू ठेवले आहेत. यापुढेही असाच कारभार सुरू राहणार नाही, याची ग्वाही कोणीही देऊ शकत नाही. त्याच्या झळा मात्र द्राक्ष पंढरीतील शेतकऱ्यांना बसणार आहेत.
तासगाव मागील दोन वर्षांपासून द्राक्षाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. द्राक्ष उत्पादनात घट झाल्यामुळे द्राक्ष दरात तेजी राहिली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षांची निर्यात केली. यामुळे मागील दोन वर्षांपासून बेदाण्याच्या उत्पादनातही कमालीची घट झाली.
उत्पादनात घट झाल्यामुळे बेदाण्याच्या दरात दुपटीने वाढ झाली. मात्र, याचा गैरफायदा घेत वर्षानुवर्षे सांगली-तासगावच्या बेदाणा इंडस्ट्रीवर स्वतःचे बस्तान बसवून करोडोंची माया गोळा करणाऱ्या काही व्यापाऱ्यांनी 'संधिसाधू' विचार करत मलई मिळवण्याचे मार्ग स्वीकारले.
अफगाणिस्तानमधून भारतात बेदाणा आयात करण्यासाठी केंद्र शासनाकडून कर नाही. याचा फायदा घेत चीनचा निकृष्ट बेदाणा चोरट्या मार्गाने आयात करण्यास सुरुवात झाली.
परिणामी बेदाण्याच्या उत्पादनात घट असूनदेखील बेदाणा उत्पादकांना समाधानकारक दरवाढ मिळाली नाही. बाहेरील देशातून आयात झालेला बेदाणा महाराष्ट्रातील बेदाण्याच्या बॉक्समध्ये घातक प्रक्रिया करून राजरोसपणे विकला जात होता.
मात्र, अपेक्षित दरवाढ न झाल्याच्या मुळापर्यंत ना प्रशासन जात होते, ना बाजार समितीचे कारभारी. द्राक्ष बागायतदार संघाने वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली, किंबहुना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या विषयावर आवाज उठवला.
मात्र, राज्यकत्यांनी आणि प्रशासनाने हा मुद्दा बेदखल केला. अखेर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, मारुती चव्हाण आणि दत्ताजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानमधून आलेल्या बेदाण्याचा भंडाफोड केला.
दोन वॉशिंग सेंटर आणि कोल्ड स्टोअरेजवर धाडी टाकून या आयातीचा पोलखोल केला. त्यानंतर बाजार समितीने या व्यापाऱ्यांचे परवाने तात्पुरत्या स्वरूपात रद्द केले.
तासगाव, सांगलीचा देशात डंकातासगाव-सांगलीची बेदाणा बाजार समिती व व्यापारी वर्तुळ देशात ओळखले जाते. सर्वांत मोठा घाऊक बाजार, सर्वाधिक उत्पादन, सर्वाधिक व्यापारी, दर ठरवण्याचे प्रमुख केंद्र, सर्वांत जास्त खरेदीदार आणि बेदाणा साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शीतगृहांची सर्वाधिक संख्या यामुळे सांगली-तासगावचा देशभरात दबदबा आहे. देशासह जगभरात निर्यात होणाऱ्या बेदाण्यांपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त बेदाणा हा सांगली-तासगावचा आहे. त्यामुळेच सांगली जिल्हा बेदाण्याची पंढरी म्हणून देशभर ओळखला जातो.
तासगाव बेदाण्याचे हबभारतात सर्वात पहिल्यांदा खुल्या लिलाव पद्धतीने तासगाव बाजार समितीत तत्कालीन मंत्री आर. आर. पाटील यांच्यासह, द्राक्ष आणि बेदाणातज्ज्ञ शेतकरी यांच्या पुढाकाराने मार्च १९९३ मध्ये बेदाणा सौद्याला सुरुवात झाली. बेदाणा निर्मितीच्या पोषक वातावरणापासून ते साठवणुकीसाठी शीतगृहापर्यंत सर्वच सुविधा निर्माण झाल्यामुळे, तासगाव आणि पाठोपाठ सांगली ही बेदाण्याची मोठी इंडस्ट्री तयार झाली. मात्र काही मूठभर व्यापाऱ्यांच्या लालसेपोटी या इंडस्ट्रीला गालबोट लागत आहे.
परकीय बेदाणा भारतीय म्हणून विकला जात आहे. भेसळ प्रतिबंधक कारवाई कायद्याअंतर्गत कठोर कारवाई व्हायला हवी. बाजार समितीने परकीय बेदाण्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचा विक्री परवाना कायमस्वरूपी रद्द करायला हवा. चुकीचे वागणाऱ्याला शासन झाले पाहिजे. बाजार समिती आणि बेदाणा असोसिएशननेही अशा व्यापाऱ्यांवर ता कारवाई केली पाहिजे. त्यासाठीच स्वाभिमानी शेतकरी संघटना आज मोर्चा काढणार आहे. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी संघटना
अधिक वाचा: पुणे जिल्ह्याला मागे टाकत सर्वाधिक ऊस गाळप करण्यात 'हा' जिल्हा आला राज्यात टॉपवर