वाशिम : शासकीय खरेदी प्रक्रियेंतर्गत राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी प्रलंबित आहे. अशातच केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान (Union Agriculture Minister Shivraj Chauhan) यांनी या मागणीची दखल घेत १० फेब्रुवारी रोजीच महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी (Soybean Procurement) २४ दिवसांची मुदतवाढ दिल्याचे वृत्त सर्वत्र पसरले.
तथापि, ८ दिवस उलटले तरी जिल्हा पणन अधिकाऱ्यांना याबाबत अधिकृत पत्र मिळाले नसल्याचे याबाबत घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. जिल्ह्यात नाफेडच्या सहा आणि व्हीसीएमएसच्या पाच अशा एकूण ११ खरेदी केंद्रांवर सोयाबीन (Soybean) विक्रीसाठी ३१,८४९ शेतकऱ्यांनी (Farmer) नोंदणी केली होती. तथापि, ६ फेब्रुवारीपर्यंत केवळ ११,९६३ शेतकऱ्यांच्या सोयाबीनचीच मोजणी पूर्ण झाली.
शासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे आणि केंद्राच्या संथ गतीमुळे साडेतीन महिन्यांतही नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे वंचित शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
अशातच १० फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा केंद्रीय कृषिमंत्र्यांनी २४ दिवसांची मुदतवाढ दिल्याचे वृत्त झळकले. मात्र, यासंबंधी कोणतेही लेखी आदेश जिल्हा प्रशासनास मिळालेले नाहीत. परिणामी, केंद्राकडून दिलेल्या मुदतवाढीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
नाफेडच्या केंद्रात किती शेतकऱ्यांची मोजणी
मालेगाव | ५२६ |
मानोरा | ७९१ |
रिसोड | ९१६ |
राजगाव | २५१३ |
वाशिम | ९७७ |
देगाव | १६५ |
केंद्राच्या पीएम आशा योजनेअंतर्गत मुदतवाढ
* केंद्र सरकारने प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (PM-AASHA) ही योजना १५ व्या वित्त आयोगाच्या कालावधीत २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.
* याच योजनेत समाविष्ट असलेल्या भाव समर्थन योजनेंतर्गत (PSS) सोयाबीन खरेदीला महाराष्ट्रात २४ दिवसांची व तेलंगणात १५ दिवसांची वाढ दिल्याची माहिती आहे.
व्हीसीएमएसच्या कोण्या केंद्रात किती शेतकरी वंचित
कारंजा | ६३३ |
महागाव | १३२२ |
मंगरुळपीर | २०८८ |
शेलुबाजार | १३८२ |
अनसिंग | ६५० |
पणन विभाग म्हणतो मुदतवाढ नाही
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्याची घोषणा केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये सर्वत्र पसरले. तथापि, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने कोणतीही मुदतवाढ दिली नसल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
२.५८ लाख क्विंटल मुदतीत सोयाबीनचीच मोजणी
जिल्ह्यातील ११ हमीभाव खरेदी केंद्रांमध्ये ३१ हजार ८४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी निर्धारित ६ फेब्रुवारीच्या मुदतीत केवळ ११ हजार ९६३ शेतकऱ्यांच्या २ लाख ५८ हजार क्विंटल सोयाबीनचीच मोजणी झाली.