जळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक झालेल्या पावसामुळे आणि बहुतांश प्रकल्प तुडुंब भरल्यामुळे रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर रब्बीची पेरणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात २ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत पेरणी होते.
मात्र यंदा यात वाढ होऊन ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पेरणीचा अंदाज आणि प्रत्यक्षातील प्रगती
• लक्ष्य : कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ३ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
• पेरणीची स्थिती : आतापर्यंत १ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून, डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
• प्रमुख पिके : हरभरा, मका आणि गहू या पिकांच्या लागवड क्षेत्रात यंदा लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे.
फरदड उत्पादनाकडे दुर्लक्ष; कृषीचा दावा: खत साठा पुरेसा
• खताची मागणी : यंदाच्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख १७ हजार ४०० मेट्रीक टन खतांची मागणी केली आहे.
• पुरवठा : कृषी विभागाने खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून मागणीनुसार पुरवठा केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
• कापूस : कापसाला मिळत असलेल्या भावामुळे अजूनही काही भागात कापसाची लागवड सुरू असली तरी, यंदा शेतकरी कापसाचे फरदड घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रब्बी पिकांकडे शेतकरी अधिक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे.
• यंदा जिल्ह्यात ३ लाख ५० हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे.
• रब्बीच्या लागवड क्षेत्रात तब्बल १ लाख हेक्टरची वाढ होण्याचा अंदाज आहे. रब्बीतील हरभऱ्याला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
