Join us

Someshwar Sugar : सोमेश्वर साखर कारखाना यंदाच्या हंगामात किती ऊस गाळप करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 16:38 IST

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील अंतर्गत कामे उत्तम स्वरूपात सुरू असून, गतवर्षीप्रमाणेच हंगाम यशस्वी होईल, अशी खात्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केली.

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील अंतर्गत कामे उत्तम स्वरूपात सुरू असून, गतवर्षीप्रमाणेच हंगाम यशस्वी होईल, अशी खात्री सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केली.

सोमेश्वर कारखान्याचा रोलर पूजन सभारंभ सोमवारी (दि.३०) उपाध्यक्ष मिलिंद कांबळे व संचालक अभिजित काकडे यांच्या हस्ते आणि अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सभेत अध्यक्ष जगताप यांनी मार्गदर्शन केले.

पुरुषोत्तम जगताप म्हणाले, येणाऱ्या हंगामासाठी तोडणी आणि वाहतूक यंत्रणेचे करार आता पूर्ण झालेत. आतापर्यंत ११२० बैलगाड्या, ६०० डंपिंग, २० ट्रक, ३७० ट्रॅक्टर आणि ३० हार्वेस्टरसाठी करार झाले असून, पहिल्या हप्त्याचे वाटपही करण्यात आले आहे.

हंगामासाठी शेतकी विभागात एकूण ३५,५१२ एकर ऊसक्षेत्राची नोंद झाली आहे, शेतकी विभागाने शेतकऱ्यांना हार्वेस्टरने ऊसतोडणीसाठी पट्टा पद्धत अंगीकारण्याचे आवाहन केले असून, सभासद शेतकऱ्यांनी यामध्ये सहकार्य करावे, असे देखील त्यांनी सांगितले.

यावेळी संचालक सुनील भगत, शैलेश रासकर, बाळासाहेब कामथे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, खेतकरी, अजय कदम, हरीभाऊ भोंडवे, तुषार माहूरकर, जितेंद्र निगडे, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, वर्क्स मॅनेजर एन. एच. नायकोडे आणि इतर अधिकारी व कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.

सोमेश्वर कारखान्याकडे येणाऱ्या गाळप हंगामासाठी ३५,५१२ एकर उसाची नोंद झाली असून, नोंदवलेल्या क्षेत्रातून १२ ते साडेबारा लाख मेट्रिक टन ऊस गाळण्याचे काम वेळेत करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.

सभासद, अधिकारी, कर्मचारी व ऊसतोडणी वाहतुकीच्या यंत्रणेच्या सहकार्याने येणारा हंगाम यशस्वी होईल, ही आशा व्यक्त करण्यात आली आहे.

सोमेश्वर कारखान्याकडे येणाऱ्या गाळप हंगामासाठी ३५,५१२ एकर उसाची नोंद झाली. साडेबारा लाख मेट्रिक टन ऊस गाळप वेळेत करण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. येणारा हंगाम यशस्वी होईल, ही आशा आहे. - पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना

अधिक वाचा: सौर कृषी पंपाच्या अडचणी संदर्भात तक्रार करण्यासाठी आला हा नवीन पर्याय; जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीकाढणीपुणेलागवड, मशागत