सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२५ या हंगामासाठी गाळप झालेल्या उसाला सभासद शेतकऱ्यांना टनाला ३४०० रुपये अंतिम दर जाहीर केला आहे. गेटकेनधारकांसाठी टनाला ३२०० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.
कारखान्याने उच्चांकी उसदराची परंपरा कायम राखल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. गुरुवारी (दि. २८) जिजाऊ सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.
गत हंगामात सभासदांना टनाला ३१७३ रुपये अदा करण्यात आले होते. यंदा उर्वरित २२७ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापैकी २० रुपये शिक्षण निधीसाठी आणि १ रुपया सोमेश्वर देवस्थानसाठी कपात करून उर्वरित २०६ रुपये दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यावर जमा होणार आहेत. बिगर सभासदांसाठी टनाला ३२०० रुपये दर जाहीर असून, त्यांना उर्वरित २७ रुपये दिले जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूक्ष्म निरीक्षण आणि मार्गदर्शनामुळे, तसेच संचालक मंडळाच्या काटकसरीच्या धोरणामुळे कारखान्याला उच्चांकी ऊस दर जाहीर करण्यात यश आले आहे.
कारखान्याची विस्तारवाढ आणि को-जनरेशन प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्याने मिळालेला नफा आणि बाय-प्रॉडक्ट्सच्या योगदानामुळे हा निर्णय शक्य झाला.
सर्व सभासद शेतकरी, अधिकारी, कामगार, उसतोड वाहतूकदार आणि मजुरांचा यात मोलाचा वाटा आहे, असे पुरुषोत्तम जगताप यांनी नमूद केले.
अधिक वाचा: साखर कारखान्यांचा कर्जाचा हप्ता थकला तर सरकारचा नवा निर्णय; होणार 'ही' मोठी कारवाई