रूपेश उत्तरवार
यवतमाळ : सध्या कृषी फिडरवर १८ तासांचे वीज भारनियमन आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यासाठी दिवसा वीज मिळत नाही. शेतकऱ्यांना सिंचन करताना रात्री अपरात्री शेतामध्ये सिंचन करण्यसाठी जावे लागते.
हे रात्रीचे सिंचन शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. मात्र, आता पुढील काळात मार्चपर्यंत सौरउर्जा वाहिनीवर ५० हजार कृषिपंपाच्या वीज जोडण्या शिफ्ट केल्या जाणार आहेत. यामुळे सिंचन करण्यासाठी दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
जिल्ह्यात १ लाख २० हजार कृषिपंपधारक आहेत. मात्र, दिवसा वीज मिळत नसल्याने सर्वच शेतकऱ्यांना रात्रीच सिंचन करावे लागते. हे सिंचन करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे कायम उभा राहतो.
शेतकऱ्यांच्या शेतशिवारात सिंचनाची व्यवस्था असतानाही वीज नसल्यामुळे अनेक कृषिपंपधारकांना ओलीत करता आले नाही. यामुळे सिंचनाची व्यवस्था असतानाही ओलीत न झाल्याने जिल्ह्याच्या एकूण उत्पादनात मोठी घट आली आहे.
आता दिवसाचे ओलीत शेतकऱ्यांना करता आले तर सिंचन मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे. यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढीला हातभार लागणार आहे.
...अशी आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
* मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत कृषी फिडरचा वीज पुरवठा जोडला जाणार आहे. सौर वीज तयार करण्यासाठी शासकीय ई-क्लास जमिनीवर असे प्लॉन्ट उभे केले जात आहेत. या ठिकाणावरून वीज घेऊन कृषी वाहिनीला ही वीज मिळणार आहे.
* जिल्ह्यात १११ वीज उपकेंद्र आहेत. यामधील ४९ उपकेंद्रांचे काम मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कृषी सौर वाहिनीसाठी १ हजार १३७ एकर जागा उपलब्ध झाली आहे. याठिकाणी सौर प्लेटा बसविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. येथे दर दिवसाला २२५ मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. या विजेचा वापर कृषिपंपासाठी केला जाणार आहे. यामुळे या ठिकाणावरून उपलब्ध होणारी वीज सरळ कृषिपंपाना उपलब्ध होणार आहे. मार्च २०२५ पर्यंत हे कामकाज पूर्ण होणार आहे.
* दुसऱ्या टप्प्यात २१ उपकेंद्रांवर, तर तिसऱ्या टप्प्यात १० उपकेंद्रांवर 3 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीतील कृषिपंपाना वीज जोडणी दिली जाणार आहे. तीन टप्प्यात जिल्ह्यातील सौर फिडरवरून वीज पुरवठा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात १ लाख २० हजार कृषिपंपधारक आहेत. ५० हजार कृषिपंपांना दिवसा वीज देण्याचे नियोजन केले जात आहे.
कृषी फिडरवर दिवसा वीज पुरवठा करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कृषी फिडर स्वतंत्र असणार आहे. यावरून शेतीला थेट दिवसा वीज मिळण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे.- प्रवीण दरोली, वीज अधीक्षक, यवतमाळ
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात वाढली आर्द्रता; कसे असेल आजचे हवामान वाचा IMD रिपोर्ट सविस्तर https://www.lokmat.com/agriculture/weather/maharashtra-weather-update-humidity-increased-in-the-arabian-sea-read-the-detailed-imd-report-on-what-todays-weather-will-be-like-a-a1003/