नुकतीच राज्य सरकारने शेतीला दिवसावीजपुरवठा करण्याची ग्वाही दिलेली आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होण्यास विलंब लागणार आहे.
पर्याय म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा व्हावा आणि त्यांच्या शेतीच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी सरकारने 'कुसुम योजने'च्या धर्तीवर सोलर योजना सुरू केली.
मात्र, पंप बसवल्यानंतर सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना वेळेवर सेवा न मिळाल्यामुळे नाराजीचा सूर उमटत आहे. सौर कृषी पंपांसाठी दबाव; पण सेवेचा अभाव अशी स्थिती झाल्याने सेवेला दाद न देणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा वीजपुरवठा व्हावा, या उद्देशाने सौर कृषी पंप बसवले. सुरुवातीचे काही दिवस विनाअडथळा हे पंप चालले; मात्र यानंतर अचानक सोलर पंप बंद पडणे, सौर पॅनलमध्ये बिघाड होणे किंवा सौर पॅनलची चोरी होणे अशा प्रकारांत वाढ झाली.
यानंतर शेतकऱ्यांनी या कंपनीला फोन केला; मात्र त्यांच्याकडून वेळेत दुरुस्ती करून मिळत नाही. यामुळे शेती पिकांना पाणी मिळत नाही आणि उन्हाळ्यात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कार्यालयात संपर्क साधला असता लेखी तक्रारी कार्यालयात देण्यास सांगितले आहे. तांत्रिक सेवा त्वरित मिळणे अपेक्षित असतानाही दिवसेंदिवस तक्रारी प्रलंबित राहतात.
परिणामी शेतकऱ्यांचे शेती पिकांना पाणी देणे इतर शेतीची कामे खोळंबतात. वेळेत दुरुस्ती होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी 'सौर कृषी पंप नको रे बाबा' असे म्हणत वीजपुरवठ्यावरील पंप सुरू केले आहेत.
अधिक वाचा: शेतजमिनीपोटी मिळालेल्या भरपाईच्या रकमेत मुलीचाही समान वाटा; उच्च न्यायालयाचा निर्णय