दत्ता पाटील
तासगाव बेदाणा तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट तयार करून चीनचा बेदाणा नेपाळसह अफगाणिस्तान मार्गे आयात करायचा आणि तो भारतीय पॅकिंगमध्ये विक्री करायचा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे.
याबाबत द्राक्ष बागायतदार संघाने सातत्याने आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे संघानेच या तस्करीची पोलखोल केली.
या वर्षभरात ५ हजार टन परदेशी बेदाणा भारतीय बाजारात आयात झाल्याचा आरोप केला जात आहे. या बेदाणा तस्करीचा पायंडा द्राक्ष इंडस्ट्रीच्या मुळावर उठला आहे.
सांगली जिल्ह्यात तयार होणाऱ्या बेदाण्याला जगभर मागणी आहे. म्हणूनच इथल्या बेदाण्याची जगभर ओळख आहे. हा बेदाणा जगभर पोचवण्यासाठी बेदाणा उत्पादक, व्यापारी, अडते आणि खरेदीदार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
मात्र, नफेखोरीच्या उद्देशाने काही व्यापाऱ्यांनी बेदाणा तस्करीचे रॅकेट निर्माण केले आहे. या तस्करीत आयातीपासून ते वेगवेगळ्या नावांवर अडत दुकानातून विक्री करून विल्हेवाट लावण्यापर्यंत अनेकांची साखळी काम करत आहे.
निर्ढावलेल्या यंत्रणेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे बेदाणा तस्करीला लगाम घालणे शक्य झाले नाही. म्हणूनच द्राक्ष बागायतदार संघाने व्यवस्थेतल्या अनियमिततेविरोधात बेदाणा तस्करीचा भांडाफोड केला.
मूळ प्रमाणपत्राची पडताळणी-प्रश्नच जास्त!
◼️ अफगाणिस्तानचा बेदाणा भारतात थेट आयात करताना, माल तिथेच तयार झाल्याचे Certificate of Origin बंधनकारक आहे.
◼️ याची कठोर पडताळणी आयात होत असताना केली जाते का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
◼️ बेदाणा तस्करीला लगाम घालणारी यंत्रणा उदासीन आहे. त्यावर अंकुश ठेवणारी शासकीय यंत्रणा निर्वावलेली आहे.
◼️ या यंत्रनिशी तस्करी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लागेबांधे निर्माण झाले आहेत. हीच गोष्ट इथल्या बेदाणा इंडस्ट्रीच्या मुळावर उठलेली आहे.
अफगाणमार्गे बेदाणा तस्करी कशासाठी?
◼️ चीनमध्ये तयार होणारा बेदाणा अत्यंत हलक्या दर्जाचा आहेच, त्यामुळे त्याचे दरही भारतीय बेदाण्याच्या निम्म्यापेक्षा कमी आहेत.
◼️ हा बेदाणा भारतात आयात करण्यासाठी बेसिक कस्टम ड्यूटी १०० टक्के, सोशल वेलफेअर सरचार्ज हा कस्टम ड्यूटीच्या १० टक्के आणि एकात्मिक वस्तू सेवा कर ५ टक्के; असा ११०% कर आकारला जातो.
कवडीमोल दराने हा बेदाणा व्यापाऱ्यांच्या पदरात
◼️ भारत आणि अफगाणिस्तानमध्ये दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्राचा करार आहे.
◼️ या करारामुळे अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या बेदाण्यावर आयात शुल्क लागत नाही.
◼️ त्यामुळे चीनचा बेदाणा अफगाणमार्गे भारतात आणला गेला, तर ११०% आयात कर वाचतो आणि कवडीमोल दराने हा बेदाणा व्यापाऱ्यांच्या पदरात पडतो.
◼️ याच बेदाण्यावर घातक प्रक्रिया करून, भारतीय बनावटीच्या पॅकिंगमध्ये विक्री होते.
अधिक वाचा: चोरट्या आयातीने बिघडले बेदाणा दराचे गणित; व्यापाऱ्यांच्या नफेखोरीचा मोह शेतकऱ्यांच्या मुळावर
