वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि सिल्क असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यात संशोधन–विस्तार कार्य, शेतकरी प्रशिक्षण आणि विद्यार्थी कौशल्य विकासाबाबतचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) शनिवार (दि.२२) नोव्हेंबर रोजी करण्यात आला. या करारामध्ये विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेंचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सदरील करार माननीय कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, संशोधन संपादक डॉ. एम. एस. पेंडके, सिल्क असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे माजी उपसंचालक (रेशीम) दिलीप हाके, राजेश उरकुडे, उपसंचालक (संशोधन) डॉ. जी.पी. जगताप, प्राध्यापक (कीटकशास्त्र) व प्रभारी अधिकारी, रेशीम संशोधन योजना डॉ. चंद्रकांत लटपटे तसेच सहाय्यक प्राध्यापक धनंजय मोहोड उपस्थित होते.
दरम्यान कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांनी रेशीम उद्योगाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठ आणि सिल्क असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करण्याचे आश्वासन दिले. रेशीम व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारा आणि रोजगारनिर्मितीस मोठी संधी देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
तर शेतकऱ्यांनी व्यक्तिगत पातळीपेक्षा गटशेती, सामूहिक प्रक्रिया युनिट्स आणि समन्वित उत्पादनपद्धती स्वीकारल्यास रेशीम व्यवसाय आत्मनिर्भर आणि अधिक लाभदायी होऊ शकतो असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला. गटशेतीमुळे तंत्रज्ञानाचा प्रसार, खर्चात बचत, तसेच बाजारव्यवस्थेवर अधिक नियंत्रण मिळू शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर कृषि तंत्र विद्यालया प्रमाणेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात “सेरीकल्चर स्कूल” स्थापन करण्याची आवश्यकता अत्यंत प्रकर्षाने व्यक्त केली.
संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी मराठवाड्यातील ‘पैठणी’चे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी विद्यापीठात “सिल्क पार्क” आणि “सॉइल टू सिल्क” या संकल्पनांची अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच संचालक शिक्षण डॉ. भगवान आसेवार यांनी भविष्यात विद्यापीठात रेशीम महाविद्यालय सुरू करण्याची शक्यता व्यक्त केली.
यावेळी बोलताना राजेश उरकुडे यांनी महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाची इतर राज्यांच्या तुलनेत होत असलेली प्रगती, रोजगारनिर्मितीच्या संधी, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करिअर मार्ग आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत माहिती दिली. तसेच विद्यापीठाशी सहकार्य दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला.
तर दिलीप हाके यांनी रेशीम कोष उत्पादनात मराठवाड्याचा तब्बल ५८ टक्के वाटा असून, या विपुल अनुभवाचा विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार कार्यासाठी मोठा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. एम. एस. पेंडके यांनी मानले.
हेही वाचा : एक एकर टोमॅटो शेतीतून ६ महिन्यांत ९ लाखांचा नफा; सुलतानवाडीतील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग
