Pune : "कृषी क्षेत्र हे येणाऱ्या काळात अनेक संधी उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहे. काही वर्षांमध्ये जगातील कृषीचे नेतृत्व भारताकडे येईल अशी स्थिती सध्या आहे." असे मत माजी साखर आयुक्त, सध्याचे यशदाचे अतिरिक्त महासंचालक आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. पुणे कृषी महाविद्यालयाने प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'प्रेरणा व्याख्यानमालेचे' आयोजन केले होते. त्यातील पहिल्या व्याख्यानावेळी ते बोलत होते.
कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षांपासूनच कृषी क्षेत्रातील बारकावे कळावेत आणि कृषी क्षेत्रातील संधी शोधता याव्यात यासाठी कृषी महाविद्यालयाने 'प्रेरणा व्याख्यानमाले'सारखे पाऊल उचलले आहे. या माध्यमातून विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांना व्यवसाय, करिअर मार्गदर्शन केले जाणार असून विद्यार्थी कल्याणासाठी विविध उपक्रमाचे आयोजनही केले जाणार असल्याची माहिती कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांनी दिली.
"कृषी क्षेत्रात शिक्षण घेणारे विद्यार्थी कधीच बेरोजगार नसतात. पुणे कृषी विद्यापिठातून शिक्षण घेऊन गेलेले अनेक माजी विद्यार्थी आज मोठमोठ्या कंपन्यांचे मालक किंवा उच्च पदावर नोकरी करतात. या क्षेत्रात प्रंचड संधी उपलब्ध आहेत. कृषी विभागातही किंवा प्रशासनातही कृषीचे कित्येक विद्यार्थी आज कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना कोणता व्यवसाय करता येईल, नवीन स्टार्टअप कसा सुरू करता येईल याचाही विचार करायला हवा. येणाऱ्या काळात जागतिक कृषीचे नेतृत्व भारताकडे असेल, त्यासाठी तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी तयार राहा." असं मत शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले.
यासोबतच माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यार्थांना शिक्षण घेता घेता कमावण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासोबतच प्रथम वर्षाला असल्यापासून दोन किंवा तीन विद्यार्थ्यांमध्ये एखादा स्टार्टअप किंवा कंपनी स्थापन करून त्यामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंडचे प्रमुख डॉ. सुभाष भालेकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ प्रितम शिंदे, माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. जे. आर. कदम आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षण उपस्थित होते.