जालना : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र बदनापूर जिल्हा जालना येथे करण्यात आले होते.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी जालना प्रशांत पवार, प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र बदनापूर डॉ. एस. डी. सोमवंशी, विभाग प्रमुख प्रशिक्षण एमसीडीसी पुणे दिगंबर साबळे, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे हेमंत जगताप, तालुका कृषी अधिकारी बदनापूर जी.एम. गुजर, प्रशिक्षण अधिकारी एम सी डी सी मयूर पवार, विभागीय व्यवस्थापक ऍग्री प्लास्ट कंपनी बंगलोर सोमनाथ जाधव इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.
यावेळी प्रशांत पवार यांनी जालना जिल्ह्यामध्ये शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याचे आवश्यक असल्याचे सांगितले. तर सुरुवातीचा खर्च अधिक असल्यामुळे कमी जागेपासून उभारणी शेतकऱ्यांनी केली तर त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो असे सांगितले.
तसेच डॉ. सोमवंशी यांनी संरक्षित शेती केल्यास कमी जागेत उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार उत्पादन घेता येऊ शकते. यासोबतच जिल्ह्यांतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्रातील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तर दिगंबर साबळे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम मराठवाडा विभागामध्ये राबवेल असे सांगितले.
या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप डॉ. एस डी सोमवंशी, डॉ. संजुला भावर, मयूर पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जास्तीत जास्त प्रशिक्षण कार्यक्रम कृषि विज्ञान केंद्र येथे घेतले जातील असे देखील यावेळी डॉ. सोमवंशी यांनी सांगितले.
प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील जवळपास ५० हून अधिक शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवला. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस तंत्रज्ञानाची ओळख, त्यामधील फुलशेती व भाजीपाला लागवड, त्यावरील कीड व रोग नियंत्रण, पिकांचे मार्केटिंग व्यवस्थापन, विविध शासकीय योजना, शेडनेट हाऊस व पॉलिहाऊस मधील प्रात्यक्षिक प्रशिक्षण याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मयूर पवार यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे चे सर्व अधिकारी वर्ग यांचे सहकार्य लाभले.