पर्ससीन नेट मासेमारी सुरू होऊन अद्याप महिनाही उलटलेला नाही, तोपर्यंत खलाशांनी आपल्या गावाकडे पलायन केले आहे. दिवसेंदिवस पलायनाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे नौकामालकांना मोठा फटका बसल्याने ते आता नव्या संकटात सापडले आहेत. पळून जाणाऱ्या खलाशांमध्ये नेपाळी खलाशांची संख्या अधिक आहे.
पर्ससीन नेटने मासेमारी केल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी त्यासाठी लागणाऱ्या खलाशांसाठी नौकामालकांना पायपीट करावी लागते. त्यासाठी काम करणाऱ्या स्थानिक खलाशांची संख्या कमी पडते. म्हणून नौका मालक कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल वा अन्य राज्यांतून खलाशी आणतात.
आता नेपाळी खलाशीही अनेक नौकांवर काम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे खलाशी आणण्यासाठी नौका मालकांना परराज्यात फेऱ्या माराव्या लागतात. अनेकदा हजारो रुपये ॲडव्हान्स दिले जातात. ही रक्कम घेऊनही काही महिने काम करून खलाशी पळून जातात. त्यामुळे नौकामालकांचे आर्थिक नुकसान होते. शिवाय खलाशांची संख्या कमी झाल्याने त्यांना स्वतःला समुद्रात इतर खलाशांप्रमाणे जावे लागते.
अजून मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच सततच्या वातावरणातील बदलामुळे अनेकदा मासेमारी बंद ठेवावी लागत आहे. तरीही खलाशांच्या जेवणाचा खर्च तसेच त्यांना मासिक पगारासह हप्ताही द्यावा लागतो. हजारोंचा हा खर्च भागवताना नौकामालकांना कसरत करावी लागत आहे. आठ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा पर्ससीननेट मासेमारी सुरू झालेली आहे. अशा वेळी मालकांना साथ देण्यापेक्षा अनेक खलाशांनी पलायन केल्याचे नौकामालकांच्या लक्षात आले आहे.
त्यामुळे नौकामालक अडचणीत आले आहेत. अनेक खलाशांना लाखो रुपये ॲडव्हान्स दिले आहेत. पलायन केलेल्या खलाशांकडून ॲडव्हान्स रक्कम वसूल कशी करायची, असा प्रश्न नौकामालकांना सतावत आहे. नौकामालक संकटात असताना त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
आणखी एक संकट
पर्ससीन नौकेवर २५ ते ३० खलाशी लागतात. जिल्ह्यात खलासी मिळवताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे नौकामालकांना अन्य राज्यांमधून खलाशी आणावे लागतात. त्यासाठी खर्चही मोठा असतो. आधीच डिझेल खर्चाइतके मासे मिळत नसल्याने नौकामालक अडचणीत आहेत. त्यात खलाशांच्या पलायनाने मालकांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे.
मासेमारी हंगाम सुरू झाल्यापासून आधीच सततच्या वातावरणातील बदलामुळे आधीच अनेकदा मासेमारी बंद ठेवावी लागत आहे. त्यातच मासे मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे डिझेल, खलाशांचा खर्च भागवताना कसरत करावी लागत आहे, त्यातच अनेक नौकांवरील परराज्यातील, तसेच नेपाळमधील खलाशी पळून गेल्याने मासेमारी नौका मालकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे खलाशांअभावी नौका नांगरावर ठेवाव्या लागत असल्याने नौका मालक आर्थिक अडचणीत सापडला आहे. - नजीर वाडकर, मच्छीमार नेते, राजिवडा, रत्नागिरी.