सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याच्या यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या गळीत हंगामातील उसाचा पहिला हप्ता ३२०४ रुपये प्रतिमेट्रिक टनाप्रमाणे अदा झाला आहे. दि. १५ डिसेंबर अखेर गाळप १५८३०० मेट्रिक टन उसाचे ५० कोटी ७२ लाख पेमेंट संबंधित ऊस उत्पादक सभासदांच्या खात्यावर वर्ग केल्याची माहिती कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी दिली.
याबाबत आबासाहेब पाटील म्हणाले, कारखान्याचे प्रेरक दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि दिवंगत पी. डी. पाटील यांच्या विचारधारेनुसार, माजी सहकार मंत्री, चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज उत्तम सुरू आहे. कारखान्याने आजवर जास्तीत जास्त व किफायतशीर ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
या गळीत हंगामामध्ये आतापर्यंत ४१ दिवसांमध्ये ३ लाख ११ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी साखर उतारा ११.५७ टक्के तर ३ लाख २७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केलेले आहे. अत्याधुनिक इथेनॉल प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून, गुणवत्तापूर्ण इथेनॉलचेही उत्पादन घेण्यात येत आहे.
या हंगामासाठी १५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, शेतकरी सभासदांनी ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन आबासाहेब पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा : न चुकता लक्षात ठेवा 'या' टिप्स; तुमचेही ठिबक चालेल दोन-चार वर्ष अधिक