बिबट्या हा एक सशक्त शिकारी प्राणी आहे. जो आपल्या शारीरिक बळ आणि चपळतेसाठी ओळखला जातो. अलीकडे बिबट्याचे मानवी वसाहतीत तसेच ऊस, मका अशा घनदाट पिकांच्या शेतात आढळण्याचे प्रमाण मोठे वाढले आहे.
ज्यामुळे अनेक ठिकाणी बिबट्याशी लढताना अनेकांना जीवाशी खेळ करावा लागतो. याच अनुषंगाने बिबट्या पासून सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींची माहिती आज आपण या लेखातून घेणार आहोत.
रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळा
रात्रीच्या अंधारात एकटे बाहेर पडणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते. बिबट्या हा रात्रीच्या वेळी अधिक सक्रिय असतो. यामुळे रात्री एकटा बाहेर पडणे टाळावे.
पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा
पाळीव प्राणी ज्यात कुत्रा, बैल, गाई, म्हशी, शेळ्या या प्राण्यांच्या शोधात बिबट्या घराजवळ येतो. यासाठी रात्रीच्या वेळी आपल्या पाळीव प्राण्यांना बंदिस्त ठिकाणी ठेवा. सुरक्षित गोठ्यात त्यांना ठेवल्याने बिबट्या या प्राण्यांपर्यंत पोहोचू शकत नाही.
दरवाजे बंदिस्त करा
घराच्या सर्व दरवाजांना चांगले बंद करा. तसेच बिबट्या वावरत असलेल्या परिसरातील नागरिकांनी घराच्या बाहेर झोपणे टाळावे.
लहान मुले आणि वृद्धांना एकटे सोडू नका
लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती एकट्या बाहेर खेळायला किंवा चालायला जाऊ नयेत. बिबट्या आपल्या शिकारांसाठी रात्रीच्या वेळेस शिकार व आहारच्या शोधात फिरतो आणि अशा परिस्थितीत लहान मुले किंवा वृद्ध व्यक्ती त्याच्या नजरेत पडू शकतात.
टॉर्च आणि काठी घेऊन फिरा
रात्री बाहेर जातांना तुमच्याकडे टॉर्च आणि काठी असाव्यात. टॉर्चचा उजेड बिबट्याला भडकून त्याला घाबरवू शकतो आणि काठीचा वापर आत्मरक्षेसाठी उपयोगी ठरू शकतो. त्याचप्रमाणे आवाजही बिबट्याला घाबरवण्यासाठी उपयोगी पडू शकतो. त्यामुळे आवाज करणे किंवा मोठ्या आवाजाने गाणे लावणे हे एक चांगले उपाय असू शकतात.
बिबट्याचा सामना झाल्यास काय करावे?
जर अचानक बिबट्या तुम्हाला जवळ दिसला तर घाबरून जाणे किंवा धाव घेणे टाळा. शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. बिबट्याचा डिवचण्याचा किंवा त्याच्याशी संपर्क करण्याचा कोणताही प्रयत्न करणे धाडसी ठरू शकतो आणि हे तुमच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. तात्काळ वनविभागाला कळवून त्यांना परिस्थिती बाबत माहिती द्या.
बिबट्यापासून बचाव करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी महत्त्वाची आहे. आपली सुरक्षा राखण्यासाठी रात्रीच्या वेळी काळजी घेणे, पाळीव प्राण्यांची सुरक्षा करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
सौजन्य : वन विभाग महाराष्ट्र शासन.