Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिके वाचविण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा; ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 18:17 IST

दररोज होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शेतीतील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारून प्रयत्न करत असले तरी अपेक्षित परिणाम न मिळाल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या खामखेडा (ता. बागलाण) परिसरात दररोज होणाऱ्या हवामानातील बदलामुळे शेतीतील पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे.

पीक वाचविण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारून प्रयत्न करत असले तरी अपेक्षित परिणाम न मिळाल्याने त्यांची चिंता अधिकच वाढली आहे. गतवर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाची पिके मोठ्या प्रमाणात हातातून गेली होती.

या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न करत शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागला. मात्र चालू वर्षीही हवामानातील सततच्या बदलांमुळे रब्बी पिकांवरही संकट ओढावले आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात कडक ऊन आणि दिवाळीनंतर थंडीचे प्रमाण वाढते. ही थंडी पिकांसाठी पोषक ठरत असल्याने गहू, कांदा, हरभरा यासारखी पिके निरोगी वाढतात.

मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून ऋतुमानात मोठे बदल होत असून जानेवारी महिन्यात थंडीऐवजी ढगाळ वातावरण, सकाळी थंडी, त्यानंतर कडक ऊन आणि दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण असा विचित्र अनुभव शेतकरी घेत आहेत. या परिस्थितीमुळे उष्णता वाढून पिकांना पोषक वातावरण मिळत नसल्याचे चित्र आहे.

कांद्याची रोपे पडताहेत पिवळी

रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि रांगड्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. पुढील काळात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड लवकर सुरू केली आहे.

मात्र सध्या सर्वत्र उन्हाळी कांद्याची लागवड जोरात सुरू असल्याने आणि ढगाळ हवामानामुळे कांद्याची रोपे पिवळी पडून खराब होऊ लागली आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्यावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

शेतकरी बांधवांसाठी महाविस्तार ॲप सुरू करण्यात आले आहे. त्यावर दररोज हवामानाचा अंदाज वर्तवला जातो आणि त्यानुसार पिकांवर कोणकोणत्या औषधांची फवारणी करायची याबाबत सल्लाही दिला जातो. पिकांवरी कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. - व्ही. एस. गायकवाड, कृषी सहायक. 

हरभऱ्यावर अळी, तर गव्हावर मावा, तांबेरा

हरभरा पिकावर अळी रोग, तर गव्हावर मावा व तांबेरा रोग दिसून येत आहे. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी विविध औषधांची फवारणी करत आहेत. मात्र वाढती मजुरी, महागडी औषधे आणि वाढती महागाई या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. महागडी औषधे वापरूनही पिकांमध्ये अपेक्षित सुधारणा होत नसल्याने शेतकरी हताश व चिंतातुर झाला आहे.

हेही वाचा : मंदीच्या लाटेत देखील 'हा' शेतकरी म्हणतोय मेथीची एक जुडी देतेय ५० रुपयांचे उत्पन्न; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers Struggle with Expensive Pesticides as Diseases Plague Crops

Web Summary : Erratic weather in Nashik district is causing crop diseases, leaving farmers anxious. Despite using costly pesticides, desired results are lacking. Unseasonal rains damaged Kharif crops, and now, Rabi crops face similar threats due to fluctuating temperatures and cloudy conditions, impacting onion, wheat, and chickpea cultivation.
टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतीशेतकरीनाशिकशेती क्षेत्रहवामान अंदाज