जयेश निरपळ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शनिवार (दि. २५) पर्यंत गंगापूर व लासूर कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ५ केंद्रांवर ९६ हजार १९५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी शेतकऱ्यांना ७१ कोटी १७ लाख रुपये वितरित करण्यात आले.
सीसीआयकडून हमीभावानुसार प्रतिक्विंटल किमान ७ हजार ३२० ते कमाल ७ हजार ४८० रुपयांचा दर देण्यात आला आहे.
राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्यावतीने गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गंगापूर, तुर्काबाद व माहुली येथे तर लासूर बाजार समितींतर्गत डोणगाव व वैरागड, अशा एकूण ५ ठिकाणच्या जिनिंगमध्ये किमान आधारभूत किंमत दराने कापूस खरेदी केली जात आहे.
१० लाख क्विंटल कापूस अद्याप घरातच
• तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ६४ हजार हेक्टरवर लागवड झालेल्या क्षेत्रानुसार १६ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन अपेक्षित असताना 'सीसीआय' मार्फत आतापर्यंत केवळ एक लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
• खासगी व्यापाऱ्यांमार्फत पाच लाख क्विंटल कापूस खरेदी झाला असल्याची माहिती आहे. त्यामुळे साधारणतः दहा लाख क्विंटल कापूस अद्यापही भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवला आहे.
शेतकऱ्यांना ७१ कोटी १७ लाख रुपये वितरित
०५ सीसीआय केंद्रांवर शेतकऱ्यांकडून ९६ हजार १२५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला असून, यापोटी शेतकऱ्यांना ७१ कोटी १७ लाख रुपये वितरित करण्यात आले.
कधी किती होता दर
• नोव्हेंबर ते २५ जानेवारीअखेर गंगापूर बाजार समितीअंतर्गत एकूण तीन केंद्रांमार्फत ५३ हजार ६९२.४५ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून यासाठी कमाल ७ हजार ४०१ तर किमान ७ हजार ८८७ रुपये भाव देण्यात आला आहे.
• तर लासूर बाजार समितींतर्गत असलेल्या दोन केंद्रांमार्फत ४२ हजार ५०२.३९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. यासाठी कमाल ७ हजार ३२० तर किमान ७ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने भाव देण्यात आला.
कापूस खरेदीची आकडेवारी (क्विंटलमध्ये)
महिना | गंगापूर बाजार समिती | लासूर बाजार समिती |
नोव्हेंबर-२४ | ६१७४.१० | ५२२३ |
डिसेंबर-२४ | १९४०८.३५ | २३६७९.१९ |
जानेवारी-२५ | २८११० | १३६०० |
एकूण | ५३६९२.४५ | ४२५०२.१९ |
हेही वाचा : Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात