Join us

पंतप्रधान कृषी सिंचन योजनचे पावणेपाच कोटी अनुदान थकले; कोण जबाबदार? शेतकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 12:26 IST

केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे ४ कोटी ८० लाख रुपये अनुदान थकीत आहे. प्रत्येक वर्षी सहभागी लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे; मात्र २०२३-२४ मधील अनुदान अद्यापपर्यंत दिलेले नाही.

शिरीष शिंदे 

केंद्र व राज्याकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत सहभागी झालेल्या बीड जिल्ह्यातील १२३० शेतकऱ्यांचे ४ कोटी ८० लाख रुपये अनुदान थकीत आहे. प्रत्येक वर्षी सहभागी लाभार्थ्यांना अनुदान मिळणे अपेक्षित आहे; मात्र २०२३-२४ मधील अनुदान अद्यापपर्यंत दिलेले नाही. अनुदान मिळण्याची प्रतीक्षा असून, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शेतकऱ्यांसाठी 'प्रतिथेंब अधिक पीक' अशी टॅगलाईन ठेवत पंतप्रधान कृषी सिंचन योजना काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानावर ठिबक व तुषार संच पुरविण्यात येतात. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना सीएससीवरून अर्ज करावा लागतो.

महा-डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. निवड झालेला लाभार्थी कृषी विभागाच्या नोंदणीकृत वितरकांकडून संच खरेदी करतात. अनुदान म्हणून शेतकऱ्यांना निधी दिला जातो; मात्र २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत अनुदान दिले गेले नाही. बीड जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून निधी मागणी करण्यात आली आहे.

खासगी सावकाराकडून पैशांची जमवाजमव

• कृषी सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मिळते, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सावकार, नातेवाईक यांच्याकडून पैशांची जमवाजमव करून ठिबक, तुषार संच खरेदी केले.

• प्रत्येक वर्षी मार्चअखेर शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो; मात्र दोन वर्षे होऊनही १२३० शेतकऱ्यांचे ४ कोटी ८० लाख रुपये अनुदान थकीत आहे.

• परिणामी, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केंद्र व राज्याचा सहभाग

शेतकऱ्यांनी खरेदी प्रक्रिया केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान वितरित केले जाते. सदरील अनुदान हे केंद्र तसेच राज्य शासन वितरित करते. केंद्र सरकारचा ६० टक्के तर राज्य सरकारचा ४० टक्के सहभाग असतो.

ठिबक संचासाठी मापदंड

मीटर रुपये 
१.५ ☓ १.५ ९२२४५ 
१.२ ☓ ०.६ १२७५०१ 
५ ☓ ५  ३९३७८
६ ☓ ६ ३७६८७
१० ☓ १० २६१८१ 

पुढील आठवड्यात अनुदान मिळणार?

२०२३-२४ मधील ठिबकचे ४ कोटी ८० लाख रुपये अनुदान थकीत आहे. अनुदान मागणी यापूर्वीच करण्यात आली असून, पुढील आठवड्यापर्यंत निधीचे वितरण होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

तालुकानिहाय लाभार्थी

अंबाजोगाई - २५३ आष्टी - ३४ बीड - १ धारूर - ६ गेवराई - ८६० केज - ४६ माजलगाव - २१  परळी - ९ पाटोदा - ० एकूण - १२३० 

५ हेक्टर क्षेत्र मर्यादा 

अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के व इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते, त्यासाठी ५ हेक्टरपर्यंत क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, तसेच तुषार संचासाठी ७५ मि. मी. पाइपकरिता २४१९४ रुपये आणि ६३ मि. मी. पाइपसाठी २१५८८ रुपये अनुदान दिले जाते.

हेही वाचा : काम करतांना धूळ अन् मातीचे कण कानासाठी ठरू शकतात परिणामकारक; शेतकरी बांधवांनो 'असे' जपा कानाचे आरोग्य

टॅग्स :कृषी योजनाशेतकरीशेतीबीडसरकारी योजनामराठवाडापाणी