मराठवाड्यात सरलेल्या पावसाळ्यात ४४ लाख १७ हजार ६३५ शेतकऱ्यांचे खरीप हंगामात हाताशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाया गेले. शासनाने नुकसानभरपाईसाठी पहिल्या ४ टप्प्यांत ३१८२ कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
त्यातील २ हजार ७५ कोटी रुपयांची रक्कम २८ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अपलोड केली. त्यातील २१ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना १५६८ कोटी रुपयांचे अनुदान वाटप झाले आहे. १६ लाख शेतकऱ्यांचे ११३९ कोटी रुपयांचे अनुदान केवायसीविना पडून आहे.
छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांत जून, जुलै व ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांतील नुकसानीची मदत ७१ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यांवर वाटप केल्याचा दावा करण्यात येत आहे.
संभाजीनगर जिल्ह्यात सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानभरपाईसाठी अद्याप शासनाने आदेश जारी केलेला नाही. सोमवारी यावर निर्णय होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय यंत्रणेला असून जिल्ह्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार असून अनुदानाचा निर्णय होताच, त्या अपलोड करण्यात येणार आहेत.
ई-केवायसीनंतरच अनुदान
• ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आहे आणि ज्यांनी यापूर्वी ई-केवायसी केलेली आहे, त्यांना केवायसीच्या अटीतून सवलत दिली.
• उर्वरित शेतकऱ्यांना केवायसी केल्यानंतरच अनुदान मिळेल. बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवायसी बाकी असल्याने अनुदान वाटप झालेले नाही.
थांबलेले अनुदान
| जिल्हा | शेतकरी | प्रलंबित रक्कम |
| छत्रपती संभाजीनगर | २,१७२ | ८८ लाख |
| जालना | २,२३१ | १ कोटी |
| परभणी | ३,४९,९४९ | २१८ कोटी |
| हिंगोली | ६०,३६० | ४४ कोटी |
| नांदेड | १,३४,१८२ | ९४ कोटी |
| बीड | ६,३५,८५० | ४४९ कोटी |
| लातूर | १,९५,७३८ | १३६ कोटी |
| धाराशिव | २,४२,९३९ | १९५ कोटी |
| एकूण | १६,२३,४२१ | ११३९ कोटी |
३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसा
मराठवाड्यातील ३२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. भरपाई म्हणून शासनाने चार टप्प्यांत मदत जाहीर केली. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असा दावा शासनाने केला. मात्र, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती अनुदान गेले नाही.
