मागील पाच वर्षांत वाशिम जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीत सातत्याने वाढ दिसून आली आहे. सरासरी क्षेत्र ८९ हजार हेक्टरवरून १ लाख १८ हजार हेक्टरवर पोहोचले. त्यातही शेतकऱ्यांना मुबलक सिंचन सुविधा आणि दमदार पावसाचा आधार मिळाल्यामुळे यंदा प्रत्यक्ष पेरणी जवळपास ११ हजार हेक्टरने वाढून १,२९,१५१ हेक्टरवर झाली आहे.
पूर्वी वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामात मुख्यत्वे गहू, हरभरा, ज्वारीसह काही निवडक पारंपरिक पिकांचीच पेरणी होत असे. साधने, सुविधा मर्यादित असल्यामुळे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही शेतकऱ्यांना सिंचन करणे शक्य नसल्याने रब्बी पेरणीची जोखीम ते पत्करत नव्हते. मागील पाच वर्षांत मात्र हे चित्र बदलले. कृषी विभागाच्या विविध योजना आणि उपलब्ध सिंचन सुविधेमुळे रब्बीच्या सरासरी क्षेत्रात ४० हजार हेक्टरची वाढ झाली.
वाढलेल्या सरासरीनुसार यंदा कृषी विभागाने १,१८७६६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन केले होते. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूप अधिक झाले. त्यामुळे प्रकल्प काठोकाठ भरले आणि सिंचनासाठी शेतकऱ्यांना आधार झाल्याने यंदाही सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली. कृषी विभागाच्या अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात १ लाख २९ हजार १५१ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाली.
हरभऱ्याचे क्षेत्र घटले!
• एकीकडे वाशिम जिल्ह्यात चिया आणि गव्हाचे क्षेत्र वाढले असताना हरभऱ्याचे क्षेत्र मात्र यंदा घटले आहे.
• सरासरी ७४,६२३.४४ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित असताना यंदा ७३,६८२.५० हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे.
रब्बी पेरणीची स्थिती
| पीक | सरासरी क्षेत्र (हेक्टर) | प्रत्यक्ष पेरणी (हेक्टर) |
| हरभरा | ७४६२३.४४ | ७३६८२.५० |
| गहू | ४१५५५.५६ | ४७०८९.८० |
| मका | १२९.२३ | ४२८.४० |
| ज्वारी | ५२८.५६ | ३९९.३० |
| चिया | ०० | ६४९७.३० |
| मसूर | ०० | ११३.७० |
| करडई | ८१७.१८ | ७३८.६० |
| मोहरी | ०० | ९२ |
हेक्टरवर चियाचे क्षेत्र
सुपर फूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चियाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. गतवर्षी ३ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रात या पिकाची पेरणी झाली होती. त्यात जवळपास दुप्पट वाढ झाली असून, यंदा जिल्ह्यात ६,४९७.३० हेक्टर क्षेत्रावर चियाची पेरणी झाली आहे.
गव्हाची विक्रमी पेरणी
जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून गव्हाच्या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. सन २०२२-२३ मध्ये ३४,००८ हेक्टर, २०२३-२४ मध्ये ३८,१३७ हेक्टर, तर २०२४-२५ मध्ये ३८,९८२ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती. यंदा गतवर्षीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र ८ हजार १०७ हेक्टरने वाढले असून, तब्बल ४७,०८२ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.
हेही वाचा : दीड एकर पेरू बागेतून शेतकऱ्याने घेतली ३ लाखांची झेप; आंतरपिकांतून देखील अतिरिक्त नफा
