खरीप हंगामात पावसाने धुळधाण केल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. परंतु मुबलक पाणीसाठ्यामुळे बीड जिल्ह्यात रब्बी हंगामात पेरणी वाढली आहे. आतापर्यंत विक्रमी १४९ टक्के पीक पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पीक पेरा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने पीक उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हाती दमदार उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा आहे.
बीड जिल्ह्यात मागील हंगामात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्व धरणात पुरेसा पाणी साठा आहे. खरिपाचे पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. त्यामुळे रब्बी हंगामात अधिक पीक पेरा वाढत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. जिल्ह्याचा एकूण पेरा सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १४९.५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात अन्नधान्य, कडधान्याखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली असून नगदी पिकांकडेही शेतकऱ्यांचा कल आहे. रब्बी हंगामात ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांच्या पेरणीला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे, तर तेलबियांच्या पेरणीकडे कल कमी दिसून येत आहे.
प्रमुख पिकांची स्थिती
• ज्वारीचे जिल्ह्याचे साधारण क्षेत्र १,२८,१०८.७ हेक्टर असताना प्रत्यक्ष १,६१,०४६.० हेक्टरवर म्हणजेच १२५.७% पेरणी झाली आहे.
•गव्हाच्या क्षेत्रात मोठी वाढ पाहायला मिळत असून, ३१,१०२.८ हेक्टरच्या तुलनेत ५९,२११.० हेक्टरवर (१९०.४%) पेरणी झाली आहे.
• कडधान्यांमध्ये हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक असून १,५४,६३७.० हेक्टरवर (१४५.६%) पेरणी पूर्ण झाली आहे. मक्याची पेरणी देखील सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच १५६.८% झाली आहे.
तेलबियांकडे शेतकऱ्यांची पाठ ?
अन्नधान्य आणि कडधान्याच्या तुलनेत तेलबियांच्या पेरणीत मोठी घट दिसून येत आहे. जिल्ह्याचे तेलबियांचे साधारण क्षेत्र ६६०.४ हेक्टर असताना केवळ ३९१.० हेक्टरवर (५९.२%) पेरणी झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने करडई (५७.२%), जवस (१६.६%) आणि सूर्यफूल (२१.२%) या पिकांचा समावेश आहे.
तालुकावार पेरणीत 'केज' तालुका आघाडीवर
• जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पेरणीची टक्केवारी भिन्न असली तरी बहुतांश तालुक्यांनी १०० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे.
• केज तालुक्यात सर्वाधिक २१६% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ धारूर २१२% आणि बीड १७३ टक्के या तालुक्यांचा क्रमांक लागतो.
• पाटोदा ११२.८%, शिरूर ११३.१% आणि आष्टी १४०.४% तालुक्यांतही पेरणी समाधानकारक आहे. मात्र, गेवराई तालुक्यात ज्वारीची पेरणी केवळ ५६.२% इतकीच नोंदवण्यात आली आहे.
...असा झाला पीक पेरा
| तालुका | सर्वसाधारण क्षेत्र | प्रत्यक्ष क्षेत्र | टक्केवारी |
| बीड | ४२४७५ | ७३६५७ | १७३.४ |
| पाटोदा | ३४५६६ | ३८७४३ | ११२.१ |
| शिरूर | १७९३३ | २०२६७ | ११३.० |
| आष्टी | ३८८३८ | ५४४५१.० | १४०.० |
| गेवराई | २५०१८ | २३५३७ | ९४.१ |
| माजलगाव | १३७४९ | १८९८९ | १३८.१ |
| अंबाजोगाई | ४१२६३ | ५५६३३ | १३४.८ |
| केज | ३५४६५ | ७०५७६ | १९९.० |
| परळी | १४४५० | ३१३०२ | २१६.६ |
| धारूर | ८३४३ | १७६९१ | २१२.० |
| वडवणी | ४८३४ | ७९५८ | १६४.६ |
| एकूण | २७६९९ | ४१२८०४ | १४९.१ |
