बालाजी आडसूळ
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या प्रचलित पिकांत नव्या दमाच्या राजमाची दमदार 'एंट्री' झाली अन् नकळत अवघ्या पाच वर्षांत हे पीकधाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात 'क्रॉप पॅटर्न चेंजर' ठरल्याचे सिद्ध होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाही राजमा क्षेत्रात वृद्धी, तर हरभरा क्षेत्रात घट नोंदवली गेली आहे.
खरीप व रब्बी हे भारतीय कृषी क्षेत्रातील दोन प्रमुख हंगाम. हंगामनिहाय विचार करता काही भागांत शेतकऱ्यांची खरिपावर, तर काही भागांत रब्बी हंगामावर भिस्त असते. कळंब तालुका मात्र या दोन्ही हंगामांत पिके घेणारा तालुका म्हणून ओळखला जातो. खरीप हा प्रापंचिक अडचणी दूर करणारा अन् रब्बी हा खाण्यापिण्याचे भागवणारा हंगाम म्हणून या भागात परिचित असे.
मांजरा, तेरणा नद्यांच्या त्रिकोणात बालाघाटावर विसावलेल्या या भागात रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, जवस, सूर्यफूल, करडई ही प्रमुख पिके घेतली जायची. मात्र, अलीकडील दशकभरात या 'क्रॉप पॅटर्न'मध्ये कमालीचे बदल घडल्याचे दिसून आले. यात हरभरा क्षेत्रातही भरीव वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले.
पीक एक, नावे अनेक
उत्तम प्रोटिन्सचे स्रोत असलेल्या राजम्याला उत्तर भारतातील रसोई' घरात मानाचे स्थान. हेच पीक बालाघाटावर सन्मानाने डौलत आहे. यात उत्तर भारतात राजमा, पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यांत घेवडा संबोधतात. मांजरा, वाशिरा, तेरणा या कळंब, याशी तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मात्र यास स्वतंत्र अशी 'पावटा' ही नवी ओळख दिली आहे.
यंदा 'खुनीलाल' अन् 'पिंक चायना'
साधारणतः ८० ते ८०, ८० ते ९० दिवसांत हाती पडणारे राजम्याची विविध वाण आहेत. यात वरुण, वाघ्या, डायमंड असे काही वाण. यात आता नव्याने खुनीलाल व पिंक चायना हे वाण उपलब्ध झाले आहे. माझ्याकडे यंदा १२ एकरांत याची लागवड केली आहे, असे कोठाळवाडी येथील राजमा उत्पादक शेतकरी प्रवीण मुळे यांनी सांगितले.
राजमाची दमदार एंट्री
दरम्यान, कोविडच्या लॉकडाउन पर्वात लगतच्या वाशी तालुक्यातील सारोळा (मा.), सेलू भागातून गंभीरवाडी, ईटकूर, भोगजी भागात 'राजमा' या रब्बीतील नव्या पिकांची एंट्री झाली. पाहता-पाहता याचे क्षेत्र झपाट्याने वाढले. अलीकडे तर सारोळा, इटकूर या भागातून या पिकाचा संबंध राज्यभर विस्तार अन् प्रसार झाला आहे. रब्बीतील हरभरा पिकाइतकेच राजमा पौक प्रमुख बनले आहे.
पाच वर्षांचा प्रवास, कित्येक पट वाढ
सुरुवातीला जेमतेम शेकड्यात क्षेत्र असलेल्या राजमा पिकांचे आता हजारो हेक्टर क्षेत्रात रूपांतर झाले आहे. गतवर्षी रब्बी हंगामात सहा हजार हेक्टर क्षेत्र होते. यंदा ते ८ हजार ४९४ हेक्टर पोहोचले आहे. हा कृषी विभागाचा अंदाज असला तरी वास्तवात यापेक्षा जास्त पेरा असू शकतो. यात एकट्या इटकुरात १ हजार २५० हेक्टर राजमा आहे. कळंब, मस्सा मंडळातही अशीच स्थिती आहे. सर्वांत कमी क्षेत्र गोविंदपूर, नायगाव मंडळात आहे.
