Rabi seasons 2024 : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे यंदा रब्बीचे क्षेत्र ९ लाख १६ हजार २७१ हेक्टरने वाढले आहे. राज्यात ३७ लाख १९ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती.
यंदा मात्र, १२ डिसेंबरपर्यंतच राज्यात ४८ लाख ९१ हजार ६०४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. अद्यापही राज्यात अनेक ठिकाणी रब्बीची पेरणी सुरू असल्याने यंदा या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात रब्बी पिकाखालील सरासरी क्षेत्र ५३ लाख ९६ हजार ९६९ हेक्टर आहे. यंदा मान्सून चांगला झाल्याने रब्बी पिकांखालील क्षेत्रात किमान १० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
कृषी विभागाच्या अहवालानुसार राज्यात १२ डिसेंबरपर्यंत ४८ लाख ९१ हजार ६०४ हेक्टर अर्थात सरासरी क्षेत्राच्या ८५.९० टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मात्र यंदा अधिक पेरणी झाली आहे.
राज्यात ३७ लाख १९ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीचे क्षेत्र २४ टक्क्यांनी वाढले आहे. अद्याप रब्बी पेरणीसाठी वेळ हाती असून, अनेक ठिकाणी पेरणीला वेग आला आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
पिकनिहाय अशी झाली पेरणी
रब्बी ज्वारी १३,४६,१३८, गहू ८,१८,२६७, मका ३,४३,५४५, इतर रब्बी तृणधान्ये ५,७७२ यात (बाजरी, ओट, बार्ली, इतर), हरभरा २२,३२,८४७, इतर कडधान्ये १,०६,६१९,
करडई २७,८६०, जवस ४,२९२, तीळ ८६०, सुर्यफुल १,५३०, रब्बी तेलबिया ८,८७४ हेक्टर क्षेत्रामध्ये अशी पेरणी आतापर्यंत करण्यात आली आहे.
सर्वाधिक पेरणी लातूर विभागात
यंदाच्या रब्बी हंगामात सर्वाधिक पेरणी लातूर विभागात झाली आहे. या विभागात सरासरी १३ लाख ६३ हजार ९३० हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी अपेक्षित असताना ९ डिसेंबरपर्यंतच १३ लाख ८० हजार ९०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे प्रमाण सरासरीच्या १०१. २४ टक्के आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मात्र यंदा या विभागात रब्बीची पेरणी २०.९८ टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षी लातूर विभागात ११ लाख २१ हजार ४२१ हेक्टरवरच रब्बी पेरणी झाली होती.
पिकानिहाय गत वर्षीची आणि यंदाची रब्बी पेरणी
पिके | गतवर्षीची पेरणी | रब्बी पेरणी |
रब्बी तृणधान्ये | १८,६१,४१२ | २५,१३,७२ |
रब्बी कडधान्ये | १८,१७,४२४ | २३,३४,४६६ |
रब्बी अन्नधान्ये | ३६,७८,८३६ | ४८,४८,१८८ |
रब्बी तेलबिया | ४०,७३२ | ४३,४१६ |
विभागनिहाय गतवर्षीची आणि यंदाची रब्बी पेरणी
विभाग | गतवर्षीची पेरणी | यंदा झालेली पेरणी |
कोकण | १५६२९ | १७६२९ |
नाशिक | १,७४,१६३ | ३,८३,५१९ |
पुणे | ७,५१,५१८ | ८,७८,९०७ |
कोल्हापूर | २,८२,६७६ | ३,४७,९६० |
छ. संभाजीनगर | ४,९५,६७८ | ६,४३,९९९ |
लातूर | ११,४१,४२१ | १३,८०,९०९ |
अमरावती | ४,९८,२९३ | ६,७८,११७ |
नागपूर | ३,६०,१८९ | ३,०४,७९५ |