नागभीड : रब्बी हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात रब्बीमध्ये विविध पिकांची लागवड असली तरी लाख आणि लाखोळी पीक वरचढ ठरत आहे. तब्बल ३ हजार ४७३ हेक्टरमध्ये लाख-लाखोळीची लागवड करण्यात आली आहे. त्यानंतर हरभऱ्याची लागवड ६८० हेक्टरमध्ये करण्यात आली आहे.
तालुक्याचे मुख्य पीक धान असून, या पिकावरच तालुक्याची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. तालुक्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास २६ हजार हेक्टरमध्ये धानाची लागवड केली जाते. धान निघाल्यानंतर काही शेतकरी लाख, लाखोळी, जवस, हरभरा, गहू व इतर पिकांची लागवड करतात. तथापि, या पिकांमधून शेतकऱ्यांना फार मोठा आर्थिक लाभ होत नाही.
तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामाच्या या पिकांवर भरपूर अवलंबून असले तरी, लाख आणि लाखोळीचा विशेष महत्त्व शेतकऱ्यांच्या घरगुती उपभोगामुळे टिकून आहे.
दैनंदिन आहारामध्ये वापर
ग्रामीण भागात लाख आणि लाखोळीचा दैनंदिन आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर वापर होतो. काही वर्षापूर्वी लाखोळीवर बंदी होती, परंतु शेतकऱ्यांनी आंदोलन करून बंदी उठवून घेतली. गहू, हरभरा, लाख, लाखोळीचे पीक गरजेपेक्षा जास्त शेतकरी विक्रीस ठेवतात, परंतु बहुतेक भागाचा वापर घरगुती आहारातच होतो.
रब्बी पिकांचे क्षेत्र
- ज्वारी : ३.६० हेक्टर
- गहू : ७४२.८० हेक्टर
- मका : ८०.७० हेक्टर
- हरभरा : ६८० हेक्टर
- लाख-लाखोळी : ३,४७३ हेक्टर
- मसूर : ८१ हेक्टर
- जवस : २१६ हेक्टर
