Pune : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला अजूनही ग्रामस्थांचा विरोध आहे. पण सरकारकडून भूसंपादनासाठी पावले उचलली जात असून महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर भूसंपादनाला सुरूवात होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण या विमानतळामध्ये पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या सिताफळाचे आणि अंजिराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
पुरंदरमधील वनपुरी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव, उदाचीवाडी या सात गावामध्ये विमानतळ होणार असून यासाठी शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान, यासाठी ग्रामस्थांचा विरोध असला तरी सरकारकडून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून किंवा शेतकऱ्यांचे मत विचारात न घेता निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय.
पुरंदर विमानतळासाठी ज्या जमीनीचे भूसंपादन केले जाणार आहे त्यामध्ये ४५ हजार सिताफळांच्या झाडांचे, १३ हजार आंब्याच्या झाडांचे आणि ९०० अंजिराच्या झाडांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील या पिकांना फटका बसणार आहे. येथील सिताफळाला जीआय म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळाले असून तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी १० टक्के सिताफळाचे क्षेत्र हे विमानतळासाठी जाणार आहे.
सिताफळाचे तालुक्यातील एकूण क्षेत्र हे २२५ हेक्टर असून त्यातील २५ हेक्टर विमानतळासाठी जाणार आहे. तर अंजिराचे तालुक्यातील क्षेत्र ४५६ हेक्टर असून त्यातील केवळ ५ हेक्टर क्षेत्र विमानतळासाठी जाणार आहे. तर आंब्याचे १८५ हेक्टरपैकी १० हेक्टर क्षेत्र विमानतळासाठी जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
पुरंदर तालुका हा अंजिरासाठी प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण अंजीराच्या क्षेत्रापैकी ९० टक्के क्षेत्र हे पुरंदर मध्ये आहे. दौंडमधील खोर, खेड शिवापूर, बारामती तालुक्यातील काही भागात अंजीर आढळते.
पीक - जिल्ह्यातील एकूण क्षेत्र - तालुक्यातील क्षेत्र - विमानतळासाठी - झाडांची संख्या
- अंजीर - ६२४ हेक्टर - ४५६ हेक्टर - ५ हेक्टर - ९०० झाडे
- सिताफळ - ५०८६ हेक्टर - २४९५ हेक्टर - २२५ हेक्टर - ४५००० झाडे
- आंबा - ४५६३ हेक्टर - १८५ हेक्टर - १० हेक्टर - १३००० झाडे
