Pune : पुण्यात पहिल्यांदाच रेसिड्यू फ्री म्हणजेच रासायनिक अवशेषमुक्त प्रात्यक्षिक पिकांचे कृषी प्रदर्शन आजपासून सुरू झाले आहे. हे प्रदर्शन कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग भारत सरकार, कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून आज (ता. ६) सकाळी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते.
त्यासोबतच या कार्यक्रमासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, स्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर, माजी साखर आयुक्त आणि यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. शेखर गायकवाड, उमेदच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू, कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, "रासायनिक खतांच्या वापरामुळे आपल्या ताटातील अन्नामध्ये रसायनाचे प्रमाण वाढले आहे आणि त्यामुळे कॅन्सरसारख्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. याचे वाईट परिणाम मानवाच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. सेंद्रीय शेती वाढवायची असेल तर या शेतकऱ्यांच्या मालाला मार्केट मिळायला हवे, त्यासोबतच खरेदीदार आणि सेंद्रीय माल उत्पादक शेतकऱ्यांचे लिंकिंग होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठ आणि सरकारने पुढाकार घ्यायला हवा.
आपण पुढील एका वर्षामध्ये काही पिके निश्चित केले आहेत, त्या पिकाच्या निर्यातीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कृषी क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी सरकारच्या विविध विभागाकडून प्रयत्न केले जाणार असून २० एप्रिल दरम्यान हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात इंटर्नशिप देण्यात येणार आहे."
भारत हा जगातील सर्वांत जास्त अन्न उत्पादन करणारा देश भविष्यात बनेल आणि भारतामध्ये महाराष्ट्र नंबर एकला असेल. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रिसिजन फार्मिंग कळणे गरजेचे आहे. आपले लोकं इस्त्राईलपासून जास्त शिकत नाहीत. इस्त्राईलसारख्या देशासारखे राष्ट्रीय धोरणे आपल्याकडे असायला हवीत असे मत डॉ. शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले. माजी विद्यार्थी संघटनेकडून कृषीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा होईल असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षांपासूनच या संघटनेत सामील व्हावे असे आवाहनही गायकवाड यांनी केले.
सावित्री जत्रा आणि फुले कृषी प्रदर्शनामध्ये महिला बचत गटाचे स्टॉल लागलेले आहेत. पुणे जिल्ह्यात २७ हजार महिला गटामध्ये २ लाख ५२ हजार महिला संलग्न आहेत. या सर्व महिला ग्रामीण भागातील आहेत. शेतीचा उपक्रम राबवताना जोपर्यंत महिला सामील होत नाही तोपर्यंत कोणताही उपक्रम यशस्वी होत नाही. त्यामुळे महिलांना उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्याकडे आमचा आग्रह असतो.
शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून काम केलं तर कोणतंही काम चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. जोपर्यंत महिलांचा सहभाग वाढणार नाही तोपर्यंत सेंद्रीय शेतीलाही प्रोत्साहन मिळणार नाही. महिलांसाठी या प्रदर्शनात सावित्री जत्रेचंही आयोजन करण्यात आलं आहे. पुणे विमानतळावर महिला बचत गटाकडून उत्पादित केलेल्या मालासाठी एक स्टॉल उपलब्ध करून दिला आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या स्टॉलचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती गजानन पाटील यांनी दिली.
मानवी जीवनामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी आणि शेती. शेतीतून निर्माण होणाऱ्या प्रत्येक अन्नामुळे पृथ्वीवरील प्रत्येक जीव जगतोय. शेतीकडे आपण कसं पाहिलं पाहिजे हे सांगण्याचं काम संतांनीही केलं आहे. शेती आणि शेतीचं आपल्या जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. शेतीमध्ये शाश्वततेकडे जाणे गरजेचे आहे. रेसिड्यू फ्री शेतीसाठी विद्यापीठाने चांगलं काम केलं आहे. तर महिला बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योग तयार झाले आहेत. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आपण महिलांनी तयार केलेले प्रोडक्ट नागरिकांनी खरेदी केले पाहिजेत असं पुलकुंडवार म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणाले की, "आपण सध्या अन्नधान्यांच्या उत्पादनामध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहोत. पण शेतकऱ्यांना या मालाला चांगला दर मिळत नाही. बाजारपेठेचा विचार करून शेतकऱ्यांनी मालाचे उत्पादन घेतले पाहिजे. आपल्या विद्यापीठातून चांगले विद्यार्थी घडले पाहिजे आणि पदवीधर विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात काम केलं पाहिजे. रेसिड्यू फ्री कृषी प्रदर्शाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल."